
छत्तीसगढमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाच नक्षलवाद्यांना ठार केले. तेलंगणा-छत्तीसगढ सीमा आणि सुकमा-दंतेवाडा जिल्ह्याची सीमा अशा दोन ठिकाणी चकमक उडाली. यात दोन महिला नक्षल्यांसह एकूण पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीत ग्रे हाऊंड्जचा एक जवान जखमी झाला. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सुरक्षा दलांच्या मोठय़ा कारवाईची माहिती दिली.
दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमाभागातील मर्जुम आणि प्रतापगिरीच्या जंगलात जवळपास 40 ते 50 शस्त्रधारी नक्षलवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तेलंगणा राज्य समितीने सीमेवरील जंगल भागात ग्रे हाऊंड्ज, डीआरजी आणि सीआरपीएफची पथके तैनात करून नक्षलवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबाराला सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन महिलांसह एकूण पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले.






















































