इस्रायलमध्ये बस स्टॉपवर अंधाधुंद गोळीबार, 5 जण ठार; 15 जण जखमी

इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. जेरुसलेममधील रमोत जंक्शनवरील एका बस स्टॉपवर सोमवारी अज्ञात बंदुकधारींनी अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 5 जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांवर गोळ्या झाडून त्यांचा खात्मा केला. हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये किती जणांचा सहभाग होता हे अद्याप कळले नाही. गोळीबाराची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी शारे झेदेक आणि हदस्साह रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि सुरक्षा एजन्सींना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर घटनास्थळाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी काही गंभीर आहेत. हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. जिल्हा कमांडरच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस तुकड्या परिसरात दाखल झाल्या आहेत, असे पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.