कोरोनामुक्त झाल्यानंतरही 5 टक्के रुग्णांना गंध, चव कळत नाही; आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासोबतच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना येणाऱ्या आरोग्य समस्यांवर औषधोपचार करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन ते चार महिने उलटूनही अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यामुळे नेमके कशाप्रकारे औषधोपचार करावे, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. कोरोनामुक्त होऊन अडीच महिने उलटल्यानंतरही गंध आणि चव कळत नसल्याच्या तक्रारी पाच टक्के रुग्णांनी केल्या आहेत. कोरोनानंतरचा हा प्रभाव किती काळ राहील, याबाबत ठोस सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी दिल्लीत राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पोस्ट कोविड क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्याचे डॉ. अजीत जैन यांनी सांगितले. कोरोनामुक्त होऊन चार- पाच महिने झाल्यानंतरही थकवा जाणवत असल्याच्या समस्या 60 टक्के रुग्णांना येत आहेत. तर पाच टक्के रुग्णांची गंध आणि चव ओळखण्याची क्षमता परत आलेली नाही. ही गंभीर बाब असल्याचे जैन यांनी सांगितले. कोरोनामुक्त झाल्यानंतर अंगदुखी, थकवा, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊन व्यक्ती गंभीर आजारी असल्यास अशा रुग्णांमध्ये कोरोनानंतर जास्त प्रमाणात आरोग्य समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, कोरोनाचे सौम्य संक्रमण झालेल्या रुग्णांनी योग्य विश्रांती आणि औषधोपचार घेतल्यास कोरोनानंतर त्यांना जास्त त्रास होत नसल्याचे जैन यांनी सांगितले.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना येणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे चिंता वाढल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले. पाच महिन्यानंतर अनेक रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. मात्र, ते पूर्णपणे बरे झाले नसल्याचे जैन यांनी सांगितले. ते पूर्णपणे कधी बरे होतील, याबाबत ठोस सांगता येणार नसल्याचे जैन म्हणाले. चार महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्यांना आता हळूहळू गंध आणि चव कळत आहे. मात्र, अंगदुखी आणि थकवा येण्याची समस्या कायम आहे. तर पाच टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन अडीच ते तीन महिने झाले तरी त्यांची गंध आणि चव ओळखण्याची क्षमता परत आलेली नाही. अशा रुग्णांमुळे चिंता वाढल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.