लातूरात 5 सोयाबीन चोरांना अटक; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमध्ये एमआयडीसीतील वेअर हाऊसच्या आवारात असलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून तब्बल 70 कट्टे सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी पळवला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी पाच जणांना अटक करून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगमेश्वर चंद्रकांत हाके (वय 26), तानाजी शामराव लिंगे (वय 34), अविनाश भाऊसाहेब हाके (वय 20), किरण गुरुनाथ राठोड (वय 22) आणि फिरोज अहमद शेख (वय 22) अशी अटक केलेल्या सोयाबीन चोरट्यांची नावे आहेत.

लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील सोयाबीनचे एकूण 419 पोते ट्रकमध्ये भरून एमआयडीसी येथील वेअर हाऊसला पाठविले होते. रात्र झाल्याने ट्रकचालकाने ट्रक वेअर हाऊसच्या आवारात ठेवला आणि घरी गेला. दुसऱ्या दिवशी वेअर हाऊस येथे आल्यावर ट्रकची ताडपत्री फाडून त्यामधून 70 कट्टे सोयाबीन अज्ञात चोरट्याने चोरल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. त्याच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अंमलदार राजेंद्र देशमुख या प्रकरणाचा तपास करत होते. त्यासाठी पथक नेमण्यात आले होते.

पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल 70 कट्टे सोयाबीन ( किंमत सुमारे 02, 54,150 रुपये) व चोरीसाठी वापरलेला पिकअप असा एकूण 7,54,150/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.