बनावट लसीकरणप्रकरणी पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट लसीकरणप्रकरणी बोरिवली पोलिसांनी नुकतेच एकूण पाच हजार पानांचे आरोपपत्र बोरिवली येथील न्यायालयात सादर केले. 400 हून अधिक जणांचे पोलिसांनी जबाब नोंद असून पाच ते सहा हे सरकारी साक्षीदार आहेत.

एप्रिल महिन्यात बोरिवलीच्या आदित्य कॉलेज आणि मानसी स्टॉक या कंपनीत कर्मचाऱयांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली होती. आदित्य कॉलेजमध्ये 214 तर मानसी स्टॉक कंपनीत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे एप्रिल महिन्यात लसीकरण झाले होते. कांदिवलीत बनावट लसीकरण घोटाळा उघड झाल्यावर आदित्य कॉलेज आणि मानसी स्टॉक या कंपनीने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोरिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून डॉ. मनीष त्रिपाठी, महेंद्र प्रताप सिंग, संजय विजय गुप्ता, चंदन रामसागर सिंह, नितीन वसंत मोडे, मोहम्मद करीम अकबर अली, गुडिया रामबली यादव, शिवराज छोटूलाल पटारिया आणि निता शिवराज पटारिया, राहुल दुबे आणि राजेश पांडेला अटक केली होती.

शिवम हॉस्पिटलने आदित्य कॉलेजमध्ये लस दिली होती. डॉ. मनीष त्रिपाठी, डॉ. शिवराज पटारिया यांचे नाव पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. अटक आरोपींविरोधात पोलिसांनी आयटी कायदा, फसवणूक आणि कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलमे लावली आहेत. लसीकरण प्रकरणात आतापर्यंत मुंबईत 12 आणि नवी मुंबईत एक गुन्हा दाखल आहे.