
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशमधूनही अशाच प्रकारची एक भयंकर घटना समोर येत आहे. मध्य प्रदेशमधील खरगोन येथे एका पाच वर्षीय मुलीवर कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
खरगोन जिल्ह्यातील बकवा गावात 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळी एक पाच वर्षाची मुलगी दुकानात काही सामान खरेदी करायला जात होती. त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याने तिच्या शरीराचे बरेच लचके तोडले होते. मोठ्या मुश्किलीने लोकांनी त्या कुत्र्याला तिच्यापासून दूर केले.
तिच्या पालकांनी शेजारच्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र उपचारादरम्यान मुलीने अखेरचा श्वास घेतला. मुलीच्या शरीरावर कुत्र्याच्या चाव्याच्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तसेच गळ्या जवळ चावा घेतल्याने एक नस फाटून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला. यातच मुलीचा मृत्यू झाला.



























































