अंधश्रद्धेला बळी पडून 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची हत्या करून नाल्यात फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रमंत्रावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेपोटी बळी देण्याचे प्रकार आजही काही ठिकाणी घडत आहेत. असाच प्रकार उत्तर प्रदेशातील बांदा येथे घडला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे.

बांदा जिल्ह्यातील गायत्री नगर येथील चमरौडी परिसरात ही घटना घडली आहे. येथे राहणारी आरती (5) वर्षाची मुलगी सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत होती. खेळता खेळता ती अचानक दिसेनाशी झाली. बराच वेळ झाला ती कुठेच दिसत नाही म्हणून आरतीच्या कुटुंबीयांनी तिला खूप शोधले, पण ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी आरती हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली, तसेच तिला शेजाऱ्यांनी पळवले असावे अशी शंकाही त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली.

कुटुंबीयांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना तिचे प्रेत तिच्या  घराबाहेर असलेल्या नाल्यात सापडले. पोलिसांनी  आरतीचे प्रेत ताब्यात घेऊन शेजारी राहणाऱे मूलचंद्र, त्याची पत्नी राणी आणि इतर एका व्यक्तिला अटक केली.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मूलचंद्र, त्याची पत्नी राणी आणि एका व्यक्तीने घरासमोर खेळत असलेल्या आरतीशी गोड बोलून तिला आपल्या घरी नेऊन तिची हत्या केली. तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेपोटी त्यांनी तिची हत्या करून तिला घराबाहेर असलेल्या नाल्यात फेकून दिले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी तिची हत्या केल्याचे मान्य करून घडलेल्या प्रकाराविषयी पोलिसांना माहिती दिली. मृत आरतीच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या अल्पवयीन मुलीला वडील नाहीत आणि आता एकुलती एक मुलगीही गेल्यामुळे तिच्या आईची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

पोलिसांनी  आरतीचे शव शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात असून ते शेजाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत. लवकरच या घटनेबाबत  खुलासा करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.