माथेरानमध्ये पाच वर्षीय मुलाचा गटारात वाहून गेल्याने मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । कर्जत

माथेरानमध्ये सततधार पडणाऱ्या पावसाने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. माथेरानमधील जामा मस्जिदसमोरील गटारात पडून युवराज धीरज वालेंद्र या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

माथेरानमध्ये राहणारा पाच वर्षीय युवराज धीरज वालेंद्र हा मुलगा आणि त्याची मोठी बहिण क्लासवरून परत येताना ही घटना घडली आहे. युवराज आणि त्याची बहिण क्लासवरून येत असताना पाण्यात खेळत होते. खेळता खेळता युवराज जामा मस्जिदसमोरील गटारात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. दरम्यान युवराज हा गटारात पडल्याचे पाहताच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गटारातील मोरीत हा चिमुकला अडकून राहिल्याने त्याचा श्वास कोंडला गेला.

दरम्यान या चिमुकल्याला गटारातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाचे वडील हात रिक्षा ओढण्याचे काम करत असून आई हॉटेलमध्ये काम करत आहे. दरम्यान या चिमुकल्याच्या मृत्यूने माथेरानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.