मिठीची मगरमिठी सुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पावसाळ्यात मिठी नदीला येणारा पूर रोखण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. विहार आणि पवई तलाव भरल्यानंतर ओसंडून वाहणारे पाणी मिठी नदीत येते आणि पूरस्थिती निर्माण होते. हे पाणी रोखण्यासाठी दोन्ही तलावांच्या बंधाऱ्यांना विसर्गद्वार (डिस्चार्ज गेट)बांधण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे लवकरच मिठीची मगरमिठी सुटणार आहे.

विहार आणि पवई तलाव भरल्यावर अतिरिक्त पाणी बंधाऱ्यावरून मिठी नदीत येते. त्यामुळे पावसाळ्यात मिठी नदीची पातळी नेहमीच वाढलेली असते. त्याचबरोबर सुमारे 18 किलोमीटर परिसरातील विविध नाले मिठी नदीला मिळतात. अशा परिस्थितीत समुद्राला भरती आणि मोठा पाऊस झाल्यास मिठी नदीची पातळी वाढण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. दरवर्षीच्या पावसातच मिठीच्या परिसराला हा धोका असतो. त्यामुळे पवई व विहार तलावाचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी विसर्गद्वार बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लवकरच या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे.

विहार आणि पवई तलावावर बांधलेली धरणे बंधारे पद्धतीची असल्याने धरण भरल्यानंतर पाणी वाहून जाते. ते कोठेच अडवता येत नाही. त्यासाठी विसर्गद्वार बांधून पाणी धरणात अडविण्याचा विचार महापालिका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी मिठी नदीच्या पूरनियंत्रणासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

तज्ज्ञांकडून तलावांची पाहणी

हे गेट बांधण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेच्या तज्ज्ञांसह पालिकेच्या पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही तलावांची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. तसेच यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती जलसंपदा विभागाकडून मिळवण्यात येत आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यावर प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.

  • मिठी नदीची धोक्याची पातळी – 2.8 मिटर
  • पावसाळ्यातील सर्वसामान्य पातळी – 2.1 ते 2.3 मिटर
  • रोजचे सांडपाणी – 1 कोटी 60 लाख लिटर