जालना जिल्हा पुन्हा जलयम; अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली

जालना जिल्ह्यातील मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नदीजवळच्या गावांना पुराचा फटका बसला असून नागरिक जीव मुठीत धरुन बसले आहे. त्याच बरोबर या पावसामुळे उरल्या सुरल्या जमिनीवरील पिकेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेतातील शेत तलाव फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर आभाळच फाटल्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे.जिल्ह्यात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर तालुक्यातही रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने नद्यां-नाले, ओढे, शेतशिवार दुथडी भरुन वाहत आहेत. यात मोसंबी, द्राक्ष, सोयाबीन आदी पिकांसह फळ-भाज्याचे शेती खरडून गेली आहे. जालना जिल्ह्यातील दुधना, केळना, गिरजा, पुर्णा, गोदावरी, पारा, सुकणा अशा नद्यांसह तलाव, प्रकल्प तुडूंब भरुन वाहत आहेत.

बदनापूर-सोमठाणा रस्ता बंद
सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने अख्खा तालुका झोडपून काढला असून बदनापूरहुन सोमठाणा रस्तावर पाणी वाहत असल्याने सोमठाणा-बदनापूर रस्ता सकाळपासून बंद आहे. तालुक्यातील सर्व नद्या दुधना, लहुकी, सुकना दुथडी भरून वाहत असून संततधार सुरू असल्याने पुरसदृश परिस्थिती आहे. नदी काठच्या वसाहतीत ठिकठिकाणी पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

फळबागा, काढणीस आलेले सोयाबीन पाण्याखाली असून तालुका आपत्ती निवारण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दुपारपर्यंत पाऊस सुरूच असल्यामुळे धोक्याची परिस्थिती रहाणार आहे. नागरिकांनी सद्यस्थितीत स्वतःची व पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर चिकनगाव येथील सुकणा नदीला महापूर आला असून संभाजीनगर जिल्ह्यातील सुकणा धरणातून विसर्ग चालू असल्यामुळे नदीला पाणी वाढण्याची शक्यता आहे. तरी जास्त पाणी जर वाढल तर सुकणा नदीचे पाणी गावात येण्याची शक्यता आहे.

भोकरदनात पावसाचे धुमशान
सोमवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसाने संपुर्ण तालुक्याला झोडपुन काढले. रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे तालुक्यातील केळना, पुर्णा ,गिरीजा, रायघोळ, जुई या नद्यांना मोठा पूर आला आहे. भोकरदन शहराला लागुन असलेल्या केळना नदीला दुथडी भरून मोठा पुर आल्याने कळणा नदीने उग्र रूप धारण केले. यामुळे भोकरदन शहरातून जाफराबादसह विदर्भाला जोडला जाणारा मार्ग देखील बंद झाला आहे. शिवाय असंख्य गावांचा तालुक्याशी तुर्तास संपर्क तुटला आहे. यासह वाकडी येथुन वाहणाऱ्या जुई नदीला देखील पहिल्यांदाच मोठा पूर आल्याने नदीकाठावरची अनेक पिके व शेती पाण्याखाली गेली आहे.

नद्यांच्या पाणी प्रवाहात वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दगडवाडी येथे मंगळवारी रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान अचानक मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण होऊन पावसासह सुसाट वेगाने वारे वाहू लागले व थोड्याच वेळात अनेक झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळले. यासह मका सोयाबीन कापूस आदी पीके या वाऱ्यात जमीनदोस्त होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पुरामुळे पेपर देण्यास उशीर
दहावीची परीक्षा देण्यासाठी जाणारे तीन विद्यार्थी काही काळ अडकले. तालुक्यातील आलापूर येथील एक विद्यार्थिनी व शिपोरा बाजार येथील दोन विद्यार्थी दहावीची परीक्षा देण्यासाठी भोकरदन येथे आले. दोन्ही बाजूने भोकरदन शहराचा संपर्क तुटल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर अकरा वाजता पेपर सुरू होण्याच्या वेळेस पोहचता आले नाही. त्यांना पुन्हा भोकरदनहून परत बरंजळामार्गे भोकरदन शहरातील परीक्षा केंद्रावर यावे लागले त्यासाठी त्यांचा तब्बल एक ते दीड तास मात्र वेळ वाया गेला.

जाफराबाद तालुक्यात पाणीच पाणी
जाफराबाद तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून रात्रीतून 51.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्या-नाले तुंडूंब भरुन वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. आंबेगाव येथे विज पुडून एक बैल ठार झाला आहे. भारज येथील धरणाची असून धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यातून पाणी सुरु आहे. जाफराबाद येथील पुर्णा नदीपात्र दुथडी भरुन वाहत असून आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. टेंभुर्णीसह परिसरातील अकोलादेव, अंबेगांव, पापळ, काचनेरा, डोलखेड़ा, किन्ही, नांदखेड़ा आदी गावात पावसाने कहर केला असून नद्या नाले दुथडी भरून वाहत असून अकोला देव येथील जीवरेखा धरणासह लहान मोठे धरणे ओहरफ्लो झाली आहे. मात्र सोयाबीनसह कापूस यासारखे पिक मात्र हतातून गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

अंबड तालुका ओलाचिंब
अंबड तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर सर्वच रस्त्यांची हाल झाल्याने वाहतूकीत अडथळा व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. अंबड तालुक्यात खडकेश्वर,सिध्देश्वर पिंपळगाव सुखापुरी तलाव पूर्णपणे भरले आहे. सोमवारी चार वाजेपासून मुसळधार जोरदार पावसाचा झाल्याने खरिपांची सर्वच पिके पाण्याखाली गेली आहे. तसेच पावसामुळे सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाल्याने रस्त्यांची पूर्णपणे हाल झाले आहे. अंबड ते कुंभारपिंपळगाव या रस्त्यांचे काम सुरू असल्याने या रस्त्यांच्या अनेक ठिकाणी पूलाचे काम सुरू आहे. यात ढालसखेडा व ताडहादगाव येथील पुलाच्या बाजूने करण्यात आलेला मातीचा भराव वाहून गेल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना घनसावंगीकडे जाण्यासाठी अंबड,

संगमेश्वर नदीला महापूर आल्याने वाहतूक ठप्प
सुखापुरी महसूल मंडळात मागील 10 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार तसेच अतिवृष्टीच्या पावसांमुळे खरिपाची पिके आडवी झाली आहेत. मंडळात 164 मिमी विक्रमी अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झाल्याने नदी शेजारील सुखापुरी तसेच लखमापुरीच्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने गृहोपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. थोडया फार प्रमाणात हाती लागणाऱ्या खरीपांच्या पिकांचे देखील आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात हवामान खात्याचा अंदाजानुसार सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच आवश्यकत्येपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वच महसूल मंडळात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून तालुक्यात सरासरी 1 हजार 387.77 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे डावरगाव तसेच सुखापुरी येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हे पाणी सरळ सुखापुरीच्या नदी तसेच ओढ्याला तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दिवसभर वाहतूक खोळंबली होती. दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना लखमापुरी तसेच सुखापुरीकडील नदीच्या टोकावर पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. या आठवड्यात पडलेल्या जास्तीच्या पावसाने खरीपांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील जून ते सप्टेंबरची सरासरी 594.90 मिलीमीटर असून आजपर्यंत एकूण 1 हजार 387.77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात प्रत्येक मंडळात 2 ते 3 अतिवृष्टीचे पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वडीगोद्री परिसरात विक्रमी पाऊस
परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाचा जोर असल्याने आतपर्यंत पडत असलेल्या पावसाने वडीगोद्री परिसरात आज सकाळपर्यंत 1933 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद पाहयाला आहे तर रात्री 133 पावसाची नोंद होऊन सकाळपासून पावसाची जोर कायम असून मांगणी नदीला महापुर आल्याने वडीगोद्री विहामांडवा रस्ता दुपारपर्यंत बंद होता तर चांदसुरा नाल्यालाही पुर आल्याने शहागड पैठण महामार्ग रहादारीस बंद होता.

वडीगोद्री परिसरात सुरूवातीपासूनच पावसाने जोर असल्याने सोयाबीन, कपाशी, व खरीप हंगामातील पिकाची पुर्णतः वायाला गेली सडलेल्या अवस्थेत पाहयाला मिळत असून परिसरात आठवडाभराची विश्रांती तिन महिन्यात मिळाली नसल्याने शेत शेवाळच शेवाळमय पाहयाला मिळत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अजूनही उघडलेल्या नाही.

आपली प्रतिक्रिया द्या