
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात उत्तर प्रदेश अक्षरशः बुडाले. गंगा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याबाहेर गेली असून तब्बल 85 घाट गंगेच्या पाण्याखाली गेले आहेत. मृतदेह अक्षरशः पाण्यातूनच वाट काढत मणिकर्णिका घाटावर आणण्यात येत असून 5 कॉलनी पाण्याखाली गेल्या आहेत. तब्बल 200 कुटुंबांनी घरे सोडून सुरक्षित स्थळे गाठली असून अजूनही लाखो नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. गल्लोगल्ली मगरींची दहशत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
पीलभीतमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोन बाइक्सवर तरुण वाहून गेले. तब्बल 2 तासांनी या दोन्ही तरुणांना स्थानिक लोकांनी वाचवले. लखीमपूरमध्ये शारदा नदीही धोक्याच्या पातळीच्या 60 सेंटीमीटरवरून वाहत आहे. पलिया येथे तब्बल 1 लाख अडकले असून 170 हून अधिक गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत. कानपूर येथे एका गल्लीत मगर दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. या मगरीला स्थानिकांनी मोठय़ा शिताफीने पकडून वन विभागाच्या हवाली केले. अयोध्येतही शरयू नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुरादाबाद-दिल्ली महामार्ग कोसी नदीच्या पाण्याखाली गेला. गोंडा येथे घाघरा नदीदेखील धोक्याच्या पातळीपेक्षा 87 सेंटीमीटरवरून वाहत आहे. त्यामुळे 20 गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली.
प्रयागराज येथे गंगा नदीला पूर आल्याने थरवई गोंडवा विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला.
अयोध्येत जुन्या स्मशान घाटाजवळ अक्षरशः नदी झाली. त्यामुळे येथे होणारी पार्किंग बंद करण्यात आली.
महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर, देवरिया, बलिया, महु, आजमगढ, जौनपूर, प्रतापगढ, प्रयागराज, गाजीपुर, आजमगढ, वाराणसी, चंदौली, मिर्जापूर, सोनभद्र, भदोही, प्रयागराज, प्रतापगढ, काwशांबी, चिभकुट, बांदा या 22 जिह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.



























































