मुंबईकर सुनील वालावलकर यांची झेप, फ्लोरिडामधील पिकलबॉल स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात वेगाने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळामध्ये मुंबईकर सुनील वालावलकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद कामगिरी केली. फ्लोरिडा येथे रंगलेल्या बेनब्रीज कप स्पर्धेत 55 वर्षांवरील दुहेरी गटात त्यांनी रौप्य पदक पटकावताना दिमाखात तिरंगा फडकावला.

गेल्या काही वर्षांपासून देशात ‘मिनी टेनिस’ म्हणून ओळखला जाणारा पिकलबॉल खेळ प्रचंड लोकप्रिय होत असून मुंबईतही या खेळाची व्रेझ वाढत आहे. आता गोरेगाव येथील रहिवासी असलेल्या सुनील वालावलकर यांनी थेट अमेरिकेत तिरंगा फडकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानी पिकलबॉलची छाप पाडली.

पिकलबॉलची ही मानाची स्पर्धा फ्लोरिडा येथील पिक्टोना पिकलबॉल सेंटर येथे 7 ते 11 एप्रिलदरम्यान रंगली. पुरुष दुहेरीत 55 हून अधिक वयोगटात सुनील वालावलकर यांनी अमेरिकेच्या माइक कोप्ले यांच्यासह सहभाग घेतला. अंतिम लढतीत सुनील वालावलकर-माईक कोप्ले यांना केन हटलस्टोन-रायन बर्क या अमेरिकन जोडीविरुद्ध 2-11, 5-11 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी सुनील वालावलकर-माऊक कोप्ले यांनी सेसी रॉय-ओसीकोविझ जीनी यांना 11-8, 9-11, 11-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत गाठली होती.

सुनील वालावलकर यांनी 2007 साली अमेरिकेतील हा खेळ हिंदुस्थानात आणला. त्यानंतर त्यांनी देशभरात या खेळाचा प्रसार केला. दखल घेण्याची बाब म्हणजे सुनील वालावलकर यांनी पहिल्यांदाच पिकलबॉलच्या एखाद्या स्पर्धेत पदक मिळवले. ‘पिकलबॉल खेळाच्या प्रसारासाठी मला अनेकांचे सहकार्य लाभले. आज या खेळात हिंदुस्थानींचा स्तर खूप उंचावला असून या सर्वांसोबत खेळताना माझ्या खेळातही सुधारणा झाली. त्यामुळे माझे हे पदक मी हिंदुस्थानी पिकलबॉलपटूंना समर्पित करतो,’ अशी प्रतिक्रिया सुनील वालावलकर यांनी दिली.