डास मारायचे कसे? फॉगींग मशीन बंद पडल्याने प्रशासनाला पडला प्रश्न

556

रत्नागिरी शहरामध्ये डेंग्युच्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातील काही भागात डेंग्युचे रुग्ण सापडत असताना रत्नागिरी नगरपरिषदेकडून डास निर्मुलन मोहिम राबवण्याची अपेक्षा नागरीक करत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेने डास निर्मुलनासाठी घेतलेले फॉगींग मशीन बंद पडल्याने डास मारायचे कसे? हा प्रश्न आता नगरपरिषद प्रशासनाला पडला आहे.

रत्नागिरी शहरात यापुर्वीच डेंग्युच्या अळ्या सापडल्याची धोक्याची सूचना हिवताप अधिकाऱ्यांना दिली होती. गेल्या महिनाभरात सुमारे 10 डेंग्युचे रुग्ण सापडले असल्याने डास निर्मुलन मोहिम राबवणे आवश्यक झाले आहे. हिवताप निर्मुलन अधिकाऱ्यांनी डेंग्युच्या अळ्या सापडल्याची धोक्याची सूचना दिल्यानंतर नगरपरिषदेने तात्काळ फॉगींग मशीन घेतले होते. फॉगींग मशीनने धूर मारुन डास निर्मुलन मोहिम राबवली जाते. शहरात डेंग्युचे रुग्ण सापडल्यानंतर फॉगींग मशीनचा शोध सुरु झाला. हे फॉगींग मशीन बंद पडलेल्या अवस्थेत सापडले. कोणी चार्जिंग संपल्याचे सांगितले तर कोणी त्याची केबल तुटल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे आता डास कसे मारायचे हाच प्रश्न आता प्रासनासमोर पडला आहे.

प्रभारी नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
शहरामध्ये फॉगींग मशीनद्वारे डास मारण्याची मोहिम होत नसल्याने प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांना फॉगींग बंद असल्याचे असमाधानकारक उत्तर मिळाले. त्यावर प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि तात्काळ नवीन फॉगींग मशीन खरेदी करा अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या