दशावताराचे ‘ठाणे’

509

>> गीता हरवंदे

दशावतारी खेळ म्हणजे पुराणातील प्रसंगांच्या आधारे उत्स्फूर्तपणे सादर होणारा लोकनाटय़ प्रकार. कोकणच्या प्रादेशिक संस्कृतीचीं वैशिष्टय़ं, तिथलं लोकजीवन, कलाजीवन संस्कृतीसोहळ्यांच्या माध्यमातून उलगडलं जातं

आठशे वर्षे परंपरा असलेली दशावतार ही लोककला आजच्या तंत्रज्ञानाचा चहूबाजूने भडीमार असूनही टिकली आहे. म्हणूनच शासनालाही तिची दखल घ्यावी लागते आहे. पर्यायाने रसिकांच्या या ‘मर्मबंधातल्या ठेवी’चाही आदर करावासा वाटतो. ठाण्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच दशावतार नाटय़ महोत्सव झाला. दशावताराचे मूळ ‘गाथा सप्तशती’मध्ये आढळतं असं म्हटलं जातं. कारण त्या काळात सादर केल्या जाणाऱया करमणुकीच्या कार्यक्रमांत अमृत-मंथन, लक्ष्मी-विष्णू, बली-वामन यांच्या कथानकांचे उल्लेख या ग्रंथात आढळतात. दशावताराप्रमाणेच यातील सूत्रधार प्रथम गणपती-रिद्धी-सिद्धी-सरस्वती या देवांना आवाहन करतो आणि नंतर वीररसाने युक्त असे विष्णूचे दहा अवतार सादर केले जातात. ‘गाथा सप्तशती’ हा काव्यसंग्रह इ.स.च्या पहिल्या शतकात हाल नावाच्या सातवाहन सम्राटाने निर्माण केला. त्याने हजारो गाथांमधून सातशे गाथांची निवड केली म्हणून ‘सप्तशती-गाथा’, परंतु पुढे अनेक कवी व वाकाटक सम्राटांनी त्यात वेळोवेळी बदल केले आहेत. त्या काळी गायक, गायिका, नट-नटी-नर्तिकांची पथके गावोगावी कार्यक्रम करून उपजीविका करत असत. अशा या पारंपरिक लोककला इंग्रज येईपर्यंत टिकून होत्या. इंग्रजी शिक्षण आणि यंत्रयुग यामुळे नवसुशिक्षित समाजाची अभिरुची बदलू लागली. अनेक लोककला-परंपरा विकल झाल्या. अशा चोहोबाजूच्या झंझावातात ताठ कण्याने उभी असलेली ही दशावतारी नाटय़ लोककला म्हणूनच दखलपात्र ठरते.

दशावतारी खेळ म्हणजे पुराणातील प्रसंगांच्या आधारे उत्स्फूर्तपणे सादर होणारा जननाटय़ प्रकार. कोकणच्या प्रादेशिक संस्कृतीचं एक वैशिष्टय़. एकूणच कोकणातील कलाजीवन धार्मिक जीवनाच्या आधारे विकसित झाले आहे. वेगवेगळय़ा भागाप्रमाणे त्याचं स्वरूप वेगळं असेल एवढंच. रत्नागिरी जिह्यात जसं नमन तसं सिंधुदुर्ग जिह्यात दशावतार. ठाण्यातील दशावतार नाटय़ महोत्सवात चेंदवणकर दशावतार नाटय़ मंडळ-ज्यांचे मालक, संचालक आहेत देवेंद्र मोरेश्वर नाईक यांनी ‘साक्ष देते हिंदुत्वाची… अर्थात प्रतिस्वर्ग कश्मीर’ हा नाटय़ प्रयोग सादर केला. कश्यप ऋषींच्या नावावरून या प्रदेशाला कश्मीर हे नाव प्राप्त झालं आहे. या पुराण कथावरील नाटय़ प्रयोगाबद्दल काही गोष्टींचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. साधारणतः आपल्या पुरणकथांमध्ये दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध सुष्ट प्रवृत्तीRचा झगडा असतो. त्याप्रमाणे वीरपूरचा राजा धर्मदत्त आणि जलभवासुर यांच्या युद्धात धर्मदत्त मारला जातो. या भयंकर कोसळलेल्या आपत्तीने त्याची राणी धर्मशीला वेडीपिशी होते. त्या मानसिक अवस्थेत राणी धर्मशीलाची भूमिका करणारे सुधीर तांडेल यांनी उत्तम अभिनय आणि भरकटलेल्या अवस्थेतील नृत्यविभ्रमाने रसिकांची मने जिंकून घेतली. पात्र परिचय देताना सुधीर तांडेल यांना आतापर्यंत 17 बक्षिसं मिळाली आहेत, त्याची साक्षच पटली. याच नाटय़ प्रयोगातील दुसरा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे डेंबारणीची भूमिका केलेले पंढरीनाथ घाटकर यांचा. या म्हातारीने मालवणी भाषेचा अस्सल गोडवा चाखवला आणि मैदानातल्या प्रेक्षकांना खदखदवलं.

आठवणी काळजाच्या कप्प्यात
अनेक कारणांनी आमची गावं सुटली नि आम्ही शहरवासी झालो, पण लोककलांच्या धुसर आठवणी काळजाच्या कप्प्यात जपलेल्या होत्या, त्या या महोत्सवांनी जागृत झाल्या. अनेक कालानुरूप बदल त्यात आढळले. ही लोककला जिवंत राहण्यामागचं तेही एक कारण असावं असं वाटतं. ठाण्याच्या महोत्सवात दशावतार नाटय़ मंडळ नेरूर, कुडाळ या मंडळांनी ‘संगीत सौभद्र’ हा नाटय़ प्रयोग सादर केला. ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा मार्च 1883 मध्ये पुण्यात पहिला प्रयोग झाला. हे एकच असे नाटक आहे की, प्रत्येक पिढीतील प्रत्येक नामवंत नटाने यात भूमिका केली आहे. अशी ख्याती असलेले हे नाटक कलेश्वर दशावतार मंडळाचे संचालक सुधीर कलिंगण यांनी सादर केलं. त्यांनी स्वतः कृष्णाची भूमिका निभावली. सुधीर कलिंगण यांच्या नाटय़ प्रयोगातील वेशभूषेचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. श्रीकृष्णाच्या भूमिकेतील सुधीर कलिंगण यांच्याबरोबर अनेकांना फोटो काढण्याचा मोह झाला. त्यांना साजेशी रुक्मिणी केवळ अप्रतिम. नऊवारीतील साजशृंगार केलेल्या रुक्मिणीच्या भूमिकेतील देवेंद्र राऊळ यांना पाहून ज्येष्ठांना बालगंधर्व आठवले असावेत. एकूणच पाचही दिवसांच्या महोत्सवात सर्व नऊवारी वेशभूषा ही आयती (रेडिमेड) लुगडय़ातील नव्हती. सर्वांनी पूर्ण नऊवारी साडय़ा स्वतः टापटिपीनं नेसल्या होत्या. पोटऱयांना क्लिपा लावून पाय व्यवस्थित झाकलेले होते. हे असं टापटिपीचं नऊवारी सौंदर्य फक्त दशावतारातच पाहायला मिळतं आणि ते त्यांनी तसंच जपून ठेवावं.
कलेची जोपासना

रंगमंचावर स्त्रीसारखं वावरणं, देहबोली, वस्त्रप्रावरणं सावरणं इतक्या नजाकतीनं करतात की, पाहणाऱयांनी अचंबित व्हावं. स्त्री भूमिका पुरुषांनी करणं हे दशावतारातील वैशिष्टय़ आजही जपून ठेवलेलं आहे. तिसऱया दिवशी मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाटय़ मंडळ; मोरे, कुडाळ या मंडळाने ‘तूच माझा कैवारी’ हा नाटय़ प्रयोग सादर केला. या मंडळाचे संचालक शंकर शांताराम मोर्चे हे आहेत. त्यांनी वयाच्या चौदापासूनच या नाटय़कलेला सुरुवात केली, एक-एक महिना घरापासून दूर राहून, अनेक मैल चालत जाऊन कलेची उपासना केली. चौथ्या दिवशी मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाटय़ मंडळाने ‘मायावी मधुमती’ हा पौराणिक नाटय़ प्रयोग सादर केला.

‘कलंकी अवतार’चा प्रयोग रंगला
शेवटच्या दिवशी जय हनुमान पारंपरिक दशावतार नाटय़ मंडळ-दांडेली-आरोस-सावंतवाडी या मंडळाने ‘कलंकी अवतार’ हा नाटय़ प्रयोग सादर केला. या नाटय़ मंडळाचे संचालक शरद मोचेमाडकर आहेत. गेली अकरा वर्षे हे मंडळ दशावतारांचे प्रयोग करत आहेत आणि वर्षाला जवळपास दोनशे प्रयोग होत असतात.

तबकातील निरांजनांचं महत्त्व
एका प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टीचा उल्लेख करायला हवा. हे सारे कलाकार आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी धडपडणारे कलाकार आहेत. ते कोणी खोऱयाने पैसा कमावणारे सेलिब्रिटी नव्हते. आपल्या मर्यादित कमाईत हा सारा डोलारा ते चालवत असतात. म्हणून मायबाप प्रेक्षकांकडून न मागता त्यांची अपेक्षा असते. सुज्ञ प्रेक्षकांना ते माहीत असतं. आपणहून ते तळीत पैसे टाकतात. तळी म्हणजे निरांजनाचं तबक. कोकणातील साऱयाच लोककलांत या तबकातल्या निरांजनाचं अनन्यसाधारण महत्त्व. ठाण्यातील या महोत्सवादरम्यान प्रत्यक्ष प्रयोग चालू असताना एका प्रेक्षकाने 100 रुपयांचं बक्षीस कलाकाराच्या हातात दिलं. आमच्यासारख्या प्रेक्षकांना ते खटकलं, पण क्षणात त्या कलाकाराने त्या बक्षिसाची जाहीर घोषणा करून देणाऱयाचं ‘‘अभीष्टचिंतन मंडळ हे बक्षीस स्वीकारत आहे’’ म्हणून सांगितलं. पुढे एकापाठोपाठ एक अशी बक्षिसं जाहीर होत राहिली. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकारचा त्या कलाकारांना किंचितही अडथळा होत नसे. तो प्रसंग आणि आपले संवाद ते इतके बेमालूमपणे म्हणत की, नवखे प्रेक्षक अवाक् होत. ही या कलाकारांची खासीयत म्हटली पाहिजे. त्याला कारण लिखित संहिता नसणे हेही असू शकेल. साऱया पुराणकथांचा अभ्यास असल्याशिवाय हे होणे नाही. हा दिमाखदार आणि सुनियोजित महोत्सव शहरी भागातही साजरा केला जावा असे मनोमन वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या