
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्याबद्दल अश्लील भाषेत खोटे लिखान करणार्या एका साप्ताहिकाच्या संपादकासह बुलढाण्यातील चार जणांवर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. येथील बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या बदनामी प्रकरणात सहआरोपी बुलढाण्यातीलच असल्याची कबुली मुर्तिजापूर येथील मुख्य आरोपी बबलू यादव याने दिल्याने खळबळ उडाली आहे. सहआरोपी असलेल्या चौघांनी हा मजकूर वृत्तपत्रामध्ये देऊन प्रकाशित करुन घेतला असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती ठाणेदार शिवाजी कांबळे यांनी दिली आहे. याप्रकरणी या चौघांचा पोलीस शोध घेत आहे.
मुर्तिजापूर येथे एका साप्ताहिकामध्ये बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या विरोधात व बुलढाणा प्राईडच्या विरोधात विविध वृत्त प्रकाशित करण्यात आले. तसेच, सोशल मीडियातूनही याप्रकरणी मोठ्याप्रमाणावर बदनामी करुन चारित्र्य हनन केल्याची तक्रार अरविंद दलाल यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याला दिली होती. यावरून पोलिसांनी साप्ताहिकाचे संपादक बबलू रामप्रसाद यादव यांच्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात आरोपी यादव याने उच्च न्यायालयातून जामिन मिळविला होता. मात्र, बुलढाणा पोलिसांनी सदर व्यक्ती तपासात सहकार्य करीत नसल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्याने, न्यायालयाने 11 जुलैला त्यांचा अंतरिम जामिन रद्द केला होता. यावरून बुलढाणा पोलिसांनी अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. पोलिसांनी हिसका दाखविताच, यादव याने राधेश्याम चांडक यांच्याविरोधातील मजकूर व छायाचित्रे बुलढाणा येथील जितेंद्र कायस्थ, मयूर निकम, लक्ष्मण निकम व मिठ्ठू जालान यांच्या सांगण्यावरून प्रकाशित केले असून, सदर लोकांच्या व्हॉट्सअॅप्सवर पाठविले. तसेच, एका वृत्तपत्राच्या प्रेसमधून छपाई करुन घेतल्याचे सांगितले. सदर माहिती उपरोक्त चौघांच्या सांगण्यावरून प्रकाशित केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आल्याचेही बुलढाणा शहर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.




























































