
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे उपहासात्मकरित्या म्हटले जाते. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबावरून अनेकदा टीका होत असते. सामान्यांकडून तर टीका होतच असते मात्र आता थेट न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीनेच देशातील न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. आपल्या देशातील न्यायव्यवस्था इतकी बोथट झाली आहे की लोकं न्यायालयात गेल्याचा पश्चाताप होतो, अशी टीका माजी सरन्यायधीश व राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केली आहे.
देशातील न्यायव्यवस्था इतकी जर्जर झाली आहे की न्यायालयातील न्याय हा सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेला आहे. फक्त सधन व कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकंच न्यायालयाकडे जातात. त्यामुळे सध्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी या क्षेत्रातील लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशा शब्दात गोगोई यांनी न्यायव्यवस्थेला फटकारले आहे.
‘आपण पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र आपली न्यायव्यवस्था जर्जर झाली आहे. 2020 मध्ये न्यायव्यवस्थेसहीत सर्वच क्षेत्रातील कामकाज मंद झाले आहेत. याकाळात सेशन कोर्टात 60 लाख केसेस आले आहेत तर हायकोर्टात 3 लाख व सुप्रीम कोर्टात सहा ते सात हजार केस आले आहेत. त्यामुळे आता हे सर्व केस सोडविण्यासाठी आपण एक रो़डमॅप तयार केला पाहिजे. न्यायपालिका प्रभावी केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे’, असे गोगोई यांनी सांगितले आहे.



























































