गोव्यात धक्के पे धक्का, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्यापाठोपाठ आज माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पार्सेकर हे  भाजपच्या जाहीरनामा समितीचेही निमंत्रक होते.

सलग दोन वेळा विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने पार्सेकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपने पार्सेकर यांना डावलून मांद्रे मतदारसंघातून दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे. सोपटे हे काँगेसमधून भाजपात आले आहेत.

राज्यपालपदाची ऑफर धुडकावली

भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पार्सेकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना राज्यपालपदाची, केंद्रीय मंत्रीपद तसेच खासदारकीची ऑफर देण्यात आली. मात्र पार्सेकर बधले नाहीत आणि त्यांनी ही ऑफर धुडकावली. कोणत्याही परिस्थितीत मी ही निवडणूक लढवणारच असे त्यांनी फडणवीस यांना ठामपणे सांगितले. पार्सेकर अद्याप तरी कोणत्याही पक्षासोबत नसून अपक्ष निवडणूक लढवण्यावरच त्यांचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने दोन दिवसांपूर्वीच गोव्यातील आपल्या 34 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर अनेकांनी बंडाचे निशाण फडकवले. लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची पत्नी सावित्री यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. सावित्री कवळेकर यांनी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनीही अपक्ष लढण्याचे ठरविले असून उपसभापती इसिडोर फर्नांडिस यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे.