फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, दिलीप दोशी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन

टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि एक दिग्गज फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी (23 जून 2025) हृदयविकाराच्या झटक्याने लंडन येथे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. दिलीप दोशी यांनी 1979 ते 1983 या काळात टीम इंडियाकडून खेळताना बहुमूल्य कामगिरी केली. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीमध्ये 33 कसोटी सामने आणि 15 वनडे सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात तब्बल सहा वेळा पाच विकेट घेण्याची किमया त्यांनी साधली होती. तसेच 12 वेळा चारहून अधिक विकेट त्यांनी घेतल्या आहेत.

दिलीप दोशी यांना वयाच्या 32 व्या वर्षी टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी मिळालेल्या संधीच सोनं करत पहिलास सामना गाजवला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्यांनी पहिल्याच डावात कांगारूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुंडाळलं आणि 103 धावा देत 6 विकेट घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात त्यांनी दोन विकेट घेतल्या. पहिल्याच सामन्यात त्यांनी आपल्या फिरकीची झलक दाखवून दिली होती. त्यांनी 167 धावा देत महत्त्वपूर्ण 8 विकेट घेत अगदी थाटात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीचा श्री गणेशा केला. दिलीप दोशी यांनी टीम इंडियासाठी 33 कसोटी सामने खेळले असून 114 विकेट घेतल्या आहेत. तर 15 वनडे सामने खेळले असून 22 विकेट त्यांच्या नावावर आहेत.

देशांतर्गत आणि काऊंटी क्रिकेटमध्येही त्यांनी आपली छाप पाडली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते सौराष्ट्र आणि बंगालसाठी खेळले आहेत. तसेच काऊंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर आणि वॉरविकशारचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 898 विकेट्स आहेत.