एक कोटीपर्यंतचे धन बाळगण्याची मुभा द्या!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयकर खात्याने हल्ली धाडी टाकल्या तर १६० कोटी, १७७ कोटी इतकी रक्कम सापडते असे सांगतानाच एक कोटीपर्यंतचे धन लोकांना खुशाल जवळ बाळगू द्या, अशी शिफारस काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने केंद्र सरकारला केली आहे. माजी न्यायमूर्ती एम. बी. शाह हे त्या पथकाचे प्रमुख आहेत.

रक्कम जवळ बाळगण्यासाठी सध्या असलेली २० लाखांची मर्यादा ही अगदीच अल्प आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ही २० लाखांची मर्यादा आणि त्या आधी १५ लाखांची मर्यादा त्यांनीच सुचवलेली होती हे विशेष. शाह यांच्या अधिपत्याखाली काळय़ा पैशाच्या तपासासाठी विशेष तपास पथक २०१४ सालात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आले आहे.

जुलैमध्ये आयकर खात्याने तामीळनाडूत हायवे बांधणीच्या व्यवसायातील एका कंपनीच्या २० ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यातून १६० कोटी रुपये आणि १०० किलो सोने जप्त करण्यात आले. त्याचाच हवाला देऊन माजी न्यायमूर्ती शाह यांनी एक कोटीपर्यंतचे धन बाळगू देण्यास मुभा देण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.

सध्या एखाद्याकडून आयकर खात्याने धाड टाकून रोकड जप्त केली तर ४० टक्के आयकर आणि दंड आकारून उरलेली रक्कम त्याला परत मिळते. आता तसे करू नका. एक कोटीपर्यंतची मर्यादा घाला आणि त्याहून अधिकची सापडणारी सगळी रक्कम सरकारी तिजोरीत जमा करून टाका. – n एम. बी. शाह, माजी न्यायमूर्ती, प्रमुख विशेष तपास पथक