
गेवराई नगर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. भाजप आणि अजित पवार गट आमनेसामने आले असून येथे दगडफेकीचीही घटना घडली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तत्पूर्वी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यावर भाजपा कार्यकर्ताने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमृत डावकर या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना बीडच्या खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळी दहा ते अकराच्या सुमारास माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर हे अजित पवार गटाच्या ऑफिसबाहेर उभे असताना भाजपा कार्यकर्त्याने त्यांच्यावर हल्ला केला, असा त्यांनी आरोप केला आहे. लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण केली. यात अमृत डावकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरा ते गेवराई पोलिसामध्ये तक्रार दाखल करणार आहेत.



























































