‘रिल्स क्रिएटर’च्या अपहरण प्रकरणी चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

रिल्स क्रिएटरच्या अपहरण प्रकरणी चौघांना पवई पोलिसांनी अटक केली. यश रणधीर बाबरे, प्रतीक राम शिंदे, अनिकेत राम गोडसे, समीर सुनील कुचेकर ऊर्फ एस के. अशी त्याची नावे आहेत. बेटिंग अप्सच्या विरोधात व्हिडीओ बनवल्याने हा वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदार हे रिल्स क्रिएटर असून ते विक्रोळी येथे राहतात. त्याचे इंस्टाग्रामवर एक आयडी आहे. इंस्टाग्रामवर ते रिल्स बनवून अपलोड करत असतात. ते रिल्स बनवताना विविध कन्टेन्टचा वापर करतात. एक चायनीज बेटिंग अॅप्स डाऊन लोड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात होते. त्यामुळे जनजागृती म्हणून तक्रारदार हे बेटिंग अॅप्सबाबत कॉउंटर रिल्स बनवत होते. त्या बेटिंग अॅप्सचे प्रमोशन प्रतीक शिंदेदेखील करत होता. पाच महिन्यापूर्वी अनिकेत नावाच्या व्यक्तीने प्रतीक शिंदेला रिल्स रोस्ट करू नको असे सांगितले होते. तसेच इंस्टाग्रामवर धमकी दिली होती. गेल्या महिन्यात तक्रारदार हे पवई येथे आले. तेथे यशदेखील आला.

त्याने तक्रारदार याना बोलावून काही अंतरावर नेले. त्यानंतर त्याला गाडीत जबरदस्तीने बसवले. गाडीत बसलेल्या एकाने तक्रारदार याचे तोंड दाबले. काहीअंतर पार झाल्यानंतर दोघांनी तक्रारदार याना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच एकाने चाकू काढून धमकीदेखील दिली.

प्रतीक शिंदेने तक्रारदार याना अॅप्सचे प्रमोशन करायचे असल्यास तसे प्रमोशन कर, मात्र विरोधात व्हिडीओ का तयार करतोय अशी विचारणा केली. तक्रारदार याने विरोधी व्हिडीओची रिल्स बनवणार नाही असे सांगितले. साधारण तासाभरानंतर तक्रारदार यांना कळंबोली येथे सोडले. तक्रारदार हे घाबरले असल्याने त्याने रविवारी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पवई पोलिसांनी यशला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत प्रतीक, अनिकेत, समीरचे नाव समोर आले. पोलिसांनी त्या तिघांना इंदापूरच्या भिगवन येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.