नांदेड लोकसभा मतदारसंघात चौरंगी सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे खासदार अशोकराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे, सपा-बसपा युतीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांच्यात चौरंगी सामना होणार असून, या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ येतात. त्यात भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील किनवट, हदगाव हे विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात तर लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. नांदेड लोकसभा मतदारसंघात २०१९च्या या निवडणुकीत १७ लक्ष १७ हजार ८२५ मतदार मतदानास पात्र आहेत. मागच्या वेळी या लोकसभा मतदारसंघात १७ लाख २५ हजार २१७ मतदार होते. नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार २८ मतदान केंद्रे असून, या सर्व मतदान केंद्रावर येत्या १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. भोकर-२७६९१४, नांदेड दक्षिण-२८१२३२, नांदेड उत्तर-३०८०९७, नायगाव-२८२८९८, देगलूर-२८९९०४, मुखेड-२७८७८०. जिल्ह्यात नाव वगळणे व नाव समाविष्ट करणे यासाठी गेल्या वर्षभरात पाचवेळा वेगवेगळे अभियान राबविण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर योग्य त्या सुविधा आहेत विंâवा नाही यासाठी डोंगरे व जाधव यांनी स्वतः काळजीपूर्वक पाहणी केली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील १९५१ पासूनच्या निकालाचा आढावा घेतला तर आजपर्यंत निवडून आलेले खासदार पुढीलप्रमाणे. १९५१-शंकरराव श्रीनिवासराव, १९५७-देवराव नामदेव कांबळे, १९६२-तुळशीदास जाधव, १९६७-व्यंकटराव तरोडेकर, १९७१-व्यंकटराव तरोडेकर, १९७७-केशवराव धोंडगे, १९८०-शंकरराव भाऊराव चव्हाण, १९८४-शंकरराव भाऊराव चव्हाण, १९८७-अशोक शंकरराव चव्हाण, १९८९-व्यंकटेश काब्दे, १९९१-सूर्यकांता पाटील, १९९६-गंगाधरराव कुंटूरकर, १९९८-भास्करराव पाटील, १९९९-भास्करराव पाटील, २००४-डी.बी.पाटील, २००९-भास्करराव पाटील, २०१४-अशोक शंकरराव चव्हाण.

या निवडणुकीत यावर्षी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या मान्यवरांच्या झालेल्या सभा, बैठका, मिरवणूका या माध्यमातून ही निवडणूक चांगलीच तापली आहे. १८ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोणाचे भाग्य उजळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.