
सामना प्रतिनिधी । केज
तालुक्यातील साळेगांव जवळ रविवारी पहाटे दरोडा टाकण्याच्या तयारीने बोलोरो गाडीतून पळ काढणारी चौघांची टोळी केज पोलिसांनी सिनस्टाईल पध्दतीने पकडली. या चौघाजणांकडून लाखोरुपयांचे साहित्य जप्त करून या चौघांना बेड्या ठोकल्याने पुढील अनर्थ टळला.
बीड जिल्यातील माजलगांव येथून बायपासने गढी बीडबायपासने मार्गाने एका बोलोरो गाडीतून चारजण दरोडा टाकण्याचे साहित्य घेऊन पळणारी टोळी पळत असल्याची पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांना कळताच बीड जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस सतर्क राहून शनिवार रात्र जागून काढत असतानाच रविवारी पहाटे मांजरसुंबा नेकनूर मार्गाने केज जवळ आल्याची माहिती मिळताच केज पोलिसांनी केजजवळ ही बोलोरो अडवण्याचा प्रयत्न केला. पण शहरातील शिवाजी चौकात चुकीच्या वळणाने ही गाडी पळवली पण पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून ही बोलोरो गाडी साळेगांव जवळ पकडून या गाडीतील आरोपी गाडीचालक संतोष गायकवाड, अक्षय जाधव, दिपक गायकवाड, बन गायकवाड यांना साळेगांव जवळ जेरबंद करुन त्यांच्या जवळ नगदी रोख रक्कम, मोबाईल, दोन मनीमंगळसुत्र, तीन चाकू, दोन घड्याळ, मोटार सायकल चाव्या एक बोलोरो गाडी इत्यादी साहित्य केज पोलिसांनी जप्त करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.
ही कार्यवाही करण्यासाठी पि.आय.शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शामकुमार डोंगरे,गाडीचालक गायकवाड यांच्या सह इत्तर पोलीस कर्मचाऱ्यांनी कठोर परीश्रम घेऊन हे दरोडेखोर जेरबंद करून पुढील अनर्थ टाळला. या आरोपी कडून इतरही गुन्ह्याचा शोध लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































