
- देवेंद्र भगत
मुंबईला वेगवान बनवणाऱ्या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे निम्मे काम फत्ते झाले असतानाच या प्रकल्पाच्या परिसरातील भूमिपुत्र कोळी बांधवांच्या व्यवसाय सुविधेसाठी तीन ते चार जेट्टी बांधण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ही संकल्पना मांडली असून लवकरच यावर कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शिवाय टाटा संस्थेच्या अहवालानुसार नुकसानभरपाईही देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून मुंबईला वेगवान बनवणारा कोस्टल रोड प्रकल्प बांधण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक दरम्यानच्या 10.58 किमीच्या प्रकल्पासाठी 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे 34 टक्के इंधन आणि 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या समुद्रातील कामात उभारल्या जाणाऱ्या 1 ते 10 पिलरमुळे पारंपरिक व्यवसायाला फटका बसत असल्याचा दावा कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून त्यांच्या व्यवसाय सुविधेसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहे. सद्यस्थितीत कोस्टल रोडच्या कामासाठी अमरसन गार्डन, हाजी अली, वरळी या ठिकाणी जेट्टी आहेत.
…तर पिलरच्या अंतराबाबत पुनर्विचार करू
समुद्रात एकूण 600 मीटर अंतरात बांधण्यात येणाऱ्या 1 ते 10 मधील 5 ते 10 पिलरमधील अंतर 200 मीटर ठेवण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे.
मात्र पालिकेने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनग्राफी, टाटा संस्था, सेंट्रल फिशरीज इन्स्टिटय़ूट आणि मुंबई मेरिटाइम बोर्ड आदी तज्ञ संस्थांच्या ‘एनओसी’नंतर काम करताना 60 मीटर अंतर ठेवण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे कोळी बांधवांनीच तज्ञ आणि सक्षम प्राधिकरण-संस्थेकडून पिलरच्या अंतराबाबत अहवाल सादर करावा, यामध्ये पालिकेचे नियोजन-आराखडा चुकीचे असल्याचा अहवाल आल्यास पुनर्विचार करण्याबाबत विचार करू असे आश्वासन दिल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
अडीच महिन्यांनी समुद्रातील काम सुरू
दोन पिलरमध्ये 200 मीटर अंतर ठेवावे अशी मागणी करीत स्थानिक कोळी बांधवांनी 1 ऑक्टोबरपासून समुद्रात आंदोलन सुरू केले. 14 ऑक्टोबरपासून समुद्रातील काम बंद पाडले होते. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता आंदोलन स्थगित करण्यात आले असून समुद्रातील काम पुन्हा सुरू झाले आहे. 1 ते 5 पिलरपर्यंत काम करता येणार आहे.

































































