
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण 3462 पदे भरण्यासाठीची लेखी परीक्षा आज सुरळीतपणे पार पडली. राज्यातील 1364 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 4,61,497 उमेदवारांनी अर्ज केले होते. 412200 उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.
चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्हय़ांमध्ये उमेदवारांनी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत उमेदवारांनी आपले म्हणणे मांडल्यास त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल.
वरील केंद्रावर उमेदवारांना सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी, जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे अर्चना पाटील यांनी सांगितले. बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाव्दारे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलिसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.


























































