
सामना ऑनलाईन । पाटणा
नेपाळहून हिंदुस्थानमध्ये पोहोचलेल्या हत्तींनी चांगलाच हैदोस घातला आहे. या वेळी एक हत्ती सुपौल भागात घुसला आणि 48 तासांत पाच जणांचा जीव घेतला. हत्तीने सुपौलमध्ये तीन, करजाईन आणि किसनपूरमध्ये एका व्यक्तीला ठार केले आहे. त्यानंतरही या हत्तीचा हैदोस संपलेला नाही.
गुरूवारी एका वृद्ध व्यक्ती ठार झाल्यानंतर प्रशासनाने या हत्तीला नेपाळमध्ये हाकलण्यासाठी प्रयत्न केला. हत्तीला सीमाभागातील रतनपुरापर्यंत आणण्यात आले. नंतर कुठल्याही प्रकारची हानी न होता त्याला नेपाळध्ये हुसकावण्यात आले. मदमस्त हत्तींनी इथले जनजीवन वेठीस धरले होते. हिंदुस्थान नेपाळ सीमेवरील हिदुस्थानी हद्दीत हत्ती पोहोचले आणि राधोपुर भागात दोन लोकांना त्यांनी ठार केले. या घटनेत एका लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे.
























































