लोकसभा निवडणुकीसाठी 4 हजार 663 ‘व्हीव्हीपॅट’ नगरमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
2013 साली व्हीव्हीपॅट यंत्रणा देशात पहिल्यांदा राबवली गेली. नागालँडमधल्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला.

सामना प्रतिनिधी । नगर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसोबत जोडावयाची मतदान पडताळणी यंत्रे अर्थात ’व्हीव्हीपॅट’ यंत्रे बंगळुरूहून नगरकडे रवाना झाली आहेत. जिल्ह्यासाठी एकूण चार हजार 663 ’व्हीव्हीपॅट’ यंत्रे मिळाली आहेत. नगरमध्ये ही यंत्रे आल्यानंतर त्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये नवीन एम-3 श्रेणीची मतदान यंत्रे (ईव्हीएम) वापरण्यात येणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळुरूहून नगर जिल्ह्यासाठी एम-3 प्रकारचे 8 हजार 20 बॅलेट युनीट (बीयू) व 4 हजार 663 कंट्रोल युनीट (सीयू) ऑगस्ट महिन्यात आली होती. केडगाव येथील गोदामात ही सर्व यंत्रे ठेवण्यात आली असून या सर्व यंत्रांचे तपासणीचे काम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, वैभव साळवे आणि सचिन गर्जे यांच्यासह कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही यंत्रे नगरमध्ये आणण्यात येत आहेत. त्यानंतर केडगाव येथील गोदामात ही यंत्रे ठेवण्यात येणार असून, त्यांच्या तपासणीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्याला आलेली यंत्रे
लोकसभा मतदारसंघ – 2
एकूण मतदान केंद्रे – 3 हजार 599
प्राप्त बॅलेट युनिट – 8 हजार 20
प्राप्त कंट्रोल युनिट – 4 हजार 663
प्राप्त व्हीव्हीपॅट – 4 हजार 663