सोने दुप्पट करून देतो म्हणून लावत होता चुना, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने दुप्पट करून देतो असे सांगून महिलेची फसवणूक करणाऱयाला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. सुशांत जाधव असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या गुह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला या निर्मलनगर परिसरात राहतात. त्याच परिसरात सुशांतदेखील राहतो. तीन वर्षांपूर्वी सुशांतने महिलेला सोने दुप्पट करून देतो असे सांगून सुरुवातीला काही तोळे सोने दिले. महिलेने सोने दिल्यावर सुशांतने तिला 70 हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर सुशांतने पुन्हा त्या महिलेशी संपर्क साधून तिच्याकडून सोने घेतले. दुप्पट सोने आणि पैसे मिळणार या लालचेने महिलेनेदेखील सुशांतला एकूण 17 तोळे सोने दिले. सोने दिल्यानंतर सुशांत महिलेला रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला. तसेच महिलेने रकमेबाबत आणि सोन्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

सोने देण्यास टाळाटाळ करू लागल्याने अखेर महिलेने निर्मलनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुशांतविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक शशिकांत भंडारे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. सुशांतच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान सुशांतला पोलिसांनी खार परिसरातून ताब्यात घेतले. फसवणुकीच्या गुह्यात सुशांतला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. सुशांतने आतापर्यंत किती जणांचे सोने घेतले आहे, महिलेचे घेतलेले सोने त्याने कोणाला दिले याचा तपास आता निर्मलनगर पोलीस करत आहेत.