
एक लाखाचे तीन लाख रुपये देतो असे सांगत खेळण्यातील नोटा हातात चिकटवण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. संजयकुमार भारती (४३) असे या भामट्याने नाव असून त्यांच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या खेळण्यातल्या नोटांचे ३६० बंडल व सोन्याचे १०० ग्राम वजनाची ३८ बनावट बिस्किटे जप्त केली आहेत.
संजयकुमार भारती या भामट्याने नितेश शेळके यांना तीन आठवड्यांत एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपये देतो असे सांगितले. यावर संशय आल्याने नितेश यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत भामट्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार कापूरबावडी पोलिसांनी साकेत बाळकुम रोडवरील ग्लोबल हॉस्पिटल परिसरात सापळा रचत भामट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या घरातही झडती घेतली असता नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात खेळण्यातील नोटांचा साठा केल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याने याआधी खेळण्यातल्या नोटांच्या मदतीने किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सुरू असून त्याच्या चार फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती वागळे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.


























































