पोलिसाचा गणवेश घालून विश्वास संपादित करून तोतया पोलिसाने एका कुटुंबातील तरुणांसह तरुणींना कस्टममध्ये नोकरीला लावण्याच्या बहाण्याने तब्बल 51 लाख 18 हजारांचा गंडा घातला. ही घटना 2017 ते जून 2021 कालावधीत घडली.
याप्रकरणी तोतया पोलीस राजेंद्र रामचंद्र शिंदे (43, रा. काळेपडळ, हडपसर) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याची सहकारी सुलोचना दादू सोनवणे (37, रा. विश्रांतवाडी) हिच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक मुंदडा (51, रा. शनिवार पेठ) यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दीपक आणि राजेंद्र यांची 2017 मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी राजेंद्रने पोलीस असल्याचे सांगत दीपक यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर झालेल्या भेटीवेळी राजेंद्रने पोलीस गणवेश परिधान करून दीपक यांच्यासोबत ओळख वाढविली. सुलोचना या महिलेची मदत घेऊन दीपक यांची फसवणूक करण्याच्या हेतूने कस्टममध्ये ओळख असल्याचे सांगितले. कस्टममध्ये दीपक यांचा मुलगा, भाचा आणि पुतण्याला नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी राजेंद्रने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल 51 लाख 18 हजार रुपये घेतले, मात्र चार वर्षांत कोणालाही नोकरीला लावले नाही. फसवणूक झाल्यानंतर दीपक यांनी पोलिसांकडे धाव घेऊन आरोपी राजेंद्र शिंदेची तक्रार केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करीत आहेत.
























































