
दिंडोशी-कुरारमधील गरजूंना ‘माँ मीनाताई बाळासाहेब ठाकरे’ डायलिसीस केंद्रात मोफत डायलिसीस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच लाख लोकसंख्या असलेल्या मालाड पूर्व भागात गरजूंसाठी मोफत डायलिसीस सेवा देण्याचे आश्वासन खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील प्रभू यांनी निवडणुकीदरम्यान दिले होते. त्याची वचनपूर्ती करण्यात आली.
दिंडोशीमधील त्रिवेणी नगरमधील दिव्या अपार्टमेंटमध्ये रुग्णांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने हेमोडायलिसीस केंद्र उभारले असून लाईफलाईन मेडिकेअर हॉस्पिटल संचालित ‘माँ मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसीस केंद्रा’चे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सुरुवातीला 10 डायलेसीस मशीन उपलब्ध करून महापालिकेच्या सवलतीच्या दरात डायलिसीस सेवा सुरू केली होती तसेच पुढील कालावधीत आवश्यकतेनुसार मशीन उपलब्ध करण्यात येणार असल्याचेदेखील सांगितले होते. त्या अनुसार रोटरी क्लब यांच्यावतीने नुकतेच 13 डायलेसीस मशीन उपलब्ध करण्यात आल्या. या वेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील प्रभू, रोटरी क्लबच्या योगीता जैन, निर्मला झुनझुनवाला, शालिनी गुप्ता, संगीता राठोड, बबिता राठोड, अनिता पानसरी, नैना झुनझुनवाला, श्वेता कबरा व लाईफलाईन मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ. आंबेकर, उपविभाग प्रमुख गणपत वारिसे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारकडे केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत सेवा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मान्यता दिली असून 1 एप्रिलपासून मोफत डायलिसीस सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.


























































