
सामना प्रतिनिधी । नगर
आज अनेक नवनवीन आजार मनुष्यास होत आहे, त्यामुळे लहानांपासून- मोठ्यांपर्यंत कोणालाही कधी कोणता आजार होईल, हे सांगता येत नाही. परंतु सध्याच्या महागड्या उपचार पद्धती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोफत आरोग्य शिबीरांची आवश्यकता आहे. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य करुन ईश्वर सेवा करण्याचेच कार्य ट्रस्टच्यावतीने या शिबीराच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरच्या वतीने मोफत चुंबकीय चिकित्सा शिबीराचे उद्घाटन दत्तात्रय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त गजानन ससाणे, सुजित एकाडे, गणेश राऊत, डॉ.के.बी.कावळे, हरिष पोटवार, प्रकाश आत्रम आदि उपस्थित होते.
याप्रसंगी दत्तात्रय आगरकर म्हणाले, मोफत शिबीरातील चिकित्सामुळे विविध आजारांचे निदान होणार आहे. त्यामुळे आजारांवर उपचार करणे सोपे होईल. तसेच ही उपचार पद्धती कमी खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना परवडणार आहे. हे शिबीर 14 डिसेंबर 2018 पर्यंत सुरु राहणार असल्याने नागरिकांनी त्याचा जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी डॉ.के.बी.कावळे म्हणाले, चुंबकीय चिकित्साही नवीन व जुनाट आजारांवर एक प्रभावशाली इलाज पद्धती आहे. या उपचार पद्धतीने अनेक दुर्धर आजार जसे संधीवात, दमा, रक्तदाब, मधुमेह, हायड्रोसील, मुळव्याध, हर्निया, पोलिओ, लकवा, पथरी, मोटापा, हृदयविकार, कंबर, गुडघे, स्त्रियांचे विकार आदिंवर ही चुंबकीय उपचार पद्धतीने प्रभावशाली उपचार होताता. त्यामुळे नागरिकांना याचा चांगला फायदा होतो. शिबीराच्या माध्यमातून नागरिकांनी याचा जरुर लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले. तर गजानन ससाणे यांनी आभार मानले.






























































