
<<पराग खोत>>
जनरेशन गॅप हा विषय तसा जुना, पण प्रत्येक काळात नव्याने समोर येणारा. आपली पुढची पिढी ही लाडावलेली आणि म्हणून आपलं न ऐकणारी आहे असं प्रत्येक आधीच्या पिढीला वाटत आलंय. “आमच्या वेळी असं नव्हतं’’ म्हणत जुनी पिढी नव्याला दोष देते, तर “काळ बदललाय, तुम्हीही बदला आता’’ असं सांगत नवी पिढी स्वतःच्या स्वैर वागण्याचं समर्थन करते. या दोन टोकांच्या मधोमध अडकलेली असतात ती नाती. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक याच नात्यांच्या बदलत्या गणितांचा वेध घेतं आणि विशेष म्हणजे उपदेश न करता, हलक्याफुलक्या शैलीत अर्थगर्भ विचार मांडतं.
मधुकर आणि मालती गणपुले हे सदाशिव पेठेतलं पारंपरिक मध्यमवर्गीय दांपत्य. आपला मुलगा मकरंद परदेशात जाऊन मोठा व्हावा अशी त्यांची इच्छा. मात्र त्याने लग्न करावं ते आपल्या संस्कारात, आपल्या समाजात आणि शक्यतो “पेठेतल्या’’ मुलीशीच, अशी त्यांची अट. पण लंडनला गेलेला मकरंद, तिथल्या जर्मन मुलीच्या म्हणजे गुंडा बोमनच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करून पुण्यात परततो. यानंतर गणपुलेंच्या घरात सांस्कृतिक भूकंप होतो आणि संतापलेले मधुकर गणपुले मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढतात.
यानंतर कथा थेट वीस वर्षांनी पुढे सरकते. मकरंद आणि गुंडा आता लंडनमध्ये स्थिरावले आहेत. त्यांची मुलगी मोनालिसा नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतेय. गंमत म्हणजे परदेशी असूनही गुंडाने भारतीय संस्कृती मनापासून स्वीकारलेली आहे. ती अस्खलित मराठी बोलते आणि मुलीवरही तसेच संस्कार करते. पण मोनालिसा जेव्हा शिक्षणासाठी फ्रान्सला जाते, तेव्हा नाटक एक नवं वळण घेतं. एकेकाळी मधुकर गणपुलेंना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता, त्याच प्रश्नांसमोर आता मकरंद उभा ठाकतो. इथेच नाटकाचा खरा गाभा उलगडतो – काळ बदलतो, पिढ्या बदलतात; पण नात्यांमधले प्रश्न मात्र वेगवेगळ्या रूपात परत येत राहतात. आजच्या डिजिटल युगात माणसं सतत “कनेक्टेड’’ असतात; पण भावनिकदृष्ट्या किती “जोडलेली’’ असतात? हा रोखठोक प्रश्न नाटक आपल्याला विचारतं. गणपुले कुटुंबातील सदस्य तीन देशांत विखुरलेले असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नातं आणि संवाद टिकून आहे. त्यांच्या आपापसातील संवादांतून उलगडत जाणारे टोमणे, गैरसमज, प्रेम आणि असुरक्षितता नाटकात खरी रंगत आणतात. प्रत्येक पिढीची भाषा, विचार आणि जगण्याची पद्धत वेगळी असली तरी नात्यांची ओढ कायम असते, हा संदेश हे नाटक सहजपणे पोहोचवतं.
लेखक अमोल पाटील यांनी कोणत्याही एका पिढीची बाजू घेतलेली नाही. जुन्या पिढीची भीती, नव्या पिढीची स्वातंत्र्याची ओढ आणि उद्याच्या पिढीचा बिनधास्त दृष्टिकोन या तिन्ही गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आहेत. त्यामुळे नाटक कुणाकडेही बोट दाखवत नाही; उलट प्रत्येकाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. संवाद हे या नाटकाचं मोठं बलस्थान आहे. मिश्कीलपणा आणि भावनिकता यांचा सुंदर समतोल साधला गेलाय. काही प्रसंगांत प्रेक्षक खळखळून हसतात, तर काही क्षण त्यांना नकळत गलबलून टाकतात. दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी विषयातील सूक्ष्मता अचूक पकडली आहे. पात्रांच्या हालचाली, त्यांच्या संवादांमधला नैसर्गिकपणा आणि विनोदाच्या आड दडलेली हतबलता त्यांनी नेमकेपणाने उभी केलीय.
सुनील बर्वे यांनी साकारलेला मधुकर गणपुले हा एकदम फर्मास. पारंपरिक विचारसरणी, मुलाबद्दलचं प्रेम आणि आतली असहाय्यता त्यांनी अत्यंत सहजतेने व्यक्त केलीय. हर्षदा खानविलकर यांची मालतीदेखील तितकीच लोभस वाटते. त्यांच्या भूमिकेत केवळ आई किंवा सासू नाही, तर दोन पिढ्यांमध्ये अडकलेली स्त्री दिसते. सुनील आणि हर्षदाचा कॉमेडीचा सेन्स अफलातून. अक्षर कोठारीने मकरंदच्या व्यक्तिरेखेत होत जाणारे बदल उत्तम पकडले आहेत. बाप म्हणून त्याचा त्रागा जाणवतो. वैष्णवी आंबवणे आणि शंतनू ठवळी, नव्या पिढीचा बिनधास्तपणा अगदी मोकळेपणाने साकारतात. ‘जब वी मेटा’च्या सार्वत्रिक यशानंतर शंतनूला ही मोठी व्यावसायिक संधी मिळाली आहे. मात्र या नाटकात सर्वाधिक लक्ष वेधून घेते ती शर्मिला राजाराम शिंदे. गुंडा बोमनच्या भूमिकेत ती अक्षरशः बागडलीय. तिचं जर्मन अॅक्सेंटमधलं मराठी, भूमिकेसाठी लागणारी अफाट ऊर्जा आणि भावनिक प्रसंगांमधली सहजता प्रभाव पाडते. इतर सर्व तांत्रिक अंगे उत्तम आहेत. सौरभ भालेराव याने गाणी बांधताना केलेला पारंपरिक चालींचा वापर अगदी चपखल. प्रिया बापट आणि उमेश कामत ही प्रेक्षकांची लाडकी जोडी हे नाटक आपल्यासमोर घेऊन आलीय आणि निर्माते आहेत नंदू कदम.
हे नाटक मनोरंजन करता करता एक महत्त्वाचा प्रश्नही विचारतं तो म्हणजे, “स्वातंत्र्यासाठीच्या धावपळीत नाती जपायची कशी?’’ जुन्या पिढीची स्वप्नं आता नव्या पिढीला हक्क म्हणून हवी असतात; मात्र त्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे निर्माण होणारी सांस्कृतिक दरी आणि भावनिक अंतर कमी करायचं कसं? हा मुद्दा घेऊनच ही गोष्ट पुढे जात राहते. हशा, टाळ्यांसोबतच तरल भावनिक क्षण आणि आधुनिक जीवनशैलीवर केलेलं मिश्कील भाष्य यामुळे ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक तिन्ही पिढ्यांना आपलंसं वाटावं असं आहे.
लेखक : अमोल पाटील
दिग्दर्शक : अद्वैत दादरकर
कलाकार : हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, वैष्णवी आंबवणे, शंतनू ठवळी आणि सुनील बर्वे
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाश : अमोघ फडके
संगीत : सौरभ भालेराव
वेशभूषा : श्वेता बापट
निर्माते : नंदू कदम आणि सोनल प्रॉडक्शन्स
छायाचित्र सौजन्य : संजय पेठे
























































