मुंबईत जानेवारीपासून मांजरांची नसबंदी!

1607

कुत्र्यांप्रमाणेच मुंबईत मांजरांचा वाढलेला उपद्रव रोखण्यासाठी जानेवारीपासून मांजरांची नसबंदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने चार संस्थांची निवड केली आहे. यामध्ये नर मांजराच्या नसबंदीसाठी 800 रुपये तर मांजरीच्या निर्बीजीकरणासाठी पालिका एक हजारांचा खर्च करणार आहे. यामुळे रोगराई, दुर्गंधीला आळा बसणार आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरांचा उपद्रवही प्रचंड वाढला आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळे जिवघेणा रेबीज आजार होत असल्यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी मांजरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण होत आहेत. भटक्या मांजरांच्या विष्टेमुळे पसरणारी दुर्गंधी आणि रोग याबाबत पालिकेकडे रहिवासी तक्रारीदेखील करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक आणि सध्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पालिकेच्या महासभेत मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरीही मिळाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नव्हती. दरम्यान, आता मांजरांच्या नसबंदीबाबत कार्यवाही पूर्ण झाली असून येत्या जानेवारीपासून कामाला सुरुवात होईल अशी माहिती पालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे अधिकारी डॉ. योगेश शेटय़े यांनी दिली.

मांजर वर्षातून दोन ते तीन वेळा चारहून अधिक पिलांना जन्म देत असल्यामुळे वर्षाला तब्बल 20 टक्के मांजरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांचा उपद्रवही प्रचंड वाढला आहे.

त्यामुळे मांजरांचा समावेश ‘ऍनिमल बर्थ कंट्रोल’मध्ये करावा यासाठी पालिकेने भारतीय पशुकल्याण मंडळाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यामुळे मांजरांची नसबंदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या ठिकाणी होणार निर्बीजीकरण
मुंबई व्हेटरनरी कॉलेज, परळ
इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, गोवंडी
युनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी, मालाड
ऍनिमल ऍण्ड बर्ड केअर ऍण्ड ऍडव्हान्स रिसर्च सेंटर, गोरेगाव

असे होणार काम
मांजरांच्या नसबंदी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एकूण सात इच्छुक संस्था होत्या. यापैकी पात्र ठरलेल्या चार संस्थांची निवड पालिकेने केली आहे.
मुंबईत चार ठिकाणी नसबंदीचे काम केले जाणार असून भटके मांजर पकडणे, निर्बीजीकरण करणे, त्यानंतर आठवडाभर त्याची देखभाल करणे आणि पुन्हा पकडलेल्या जागी सोडण्याची कार्यवाही संस्थांना करावी लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या