हायसिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱया वाहनांवर कारवाई; सातारा आरटीओकडून मोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने नोंदणी होणाऱया वाहनांना ही नंबर प्लेट आवश्यक आहे. परंतु अनेकांकडून या नंबर प्लेट काढून जुन्या नंबर प्लेटचा वापर करण्यात येत आहे. अशा वाहनांवर आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

1 एप्रिल 2019 नंतर नवीन उत्पादित सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा आदेश रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने दिला आहे. त्यानुसार वाहन उत्पादक किंवा वाहन वितरक यांच्या मार्फतच नंबर प्लेट बसवल्यानंतरच आरटीओ कार्यालयामध्ये वाहनाची नोंदणी करण्यात येते. मात्र, सध्या अनेक वाहनधारक या नंबर प्लेटशिवाय वाहने चालवत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक वाहनधारकांनी नंबर प्लेट काढून टाकल्या आहेत. त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणारी वाहने सातारा जिह्यात आढळून आल्यास अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले.

नंबर प्लेट नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड

 वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्यास आरटीओकडून ऑन दी स्पॉट अशा वाहनधारकांना 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहन वितरकांनीच बसवून देणे अपेक्षित आहे. नवीन वाहन घेतल्यानंतर त्यामध्ये विक्रेते या नंबर प्लेटच्या फीचा समावेश करत असतात. त्यामुळे वितरकांनी ही नंबर प्लेट बसवून दिली पाहिजे. वाहनचालकांनी नवीन वाहन घेताना याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.