ऑनलाईन प्रवेशाच्या सर्वसाधारण फेर्‍या संपल्या, शेवटच्या यादीत 50 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इनहाऊस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक या कोटय़ाद्वारे तसेच ऑनलाईन प्रवेशफेर्‍यांमधून आतापर्यंत 1 लाख 28 हजार 848 विद्यार्थ्यांचे अकरावीत प्रवेश झाले आहेत. मुंबई विभागात अकरावीच्या तब्बल 3 लाख 22 हजार 116 जागा उपलब्ध होत्या. त्यामुळे तीनही सर्वसाधारण प्रवेशफेर्‍या संपूनही निम्म्याहून अधिक म्हणजे 1 लाख 93 हजार 268 जागा रिक्त राहिल्या आहेत. अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या आज जाहीर झालेल्या तिसर्‍या म्हणजेच शेवटच्या गुणवत्ता यादीत 50 हजार 636 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

तिसर्‍या यादीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण 1 लाख 8 हजार 554 जागांसाठी 73 हजार 414 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 544 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी 2, 3 आणि 5 ऑगस्ट रोजी कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

  • शेवटच्या गुणवत्ता यादीत दोन ते दहा पसंतीक्रमाचे कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश नको असल्यास ते विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत प्रवेश घेऊ शकतात.
  • तिसर्‍या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्ट्स शाखेचे 3 हजार 690, कॉमर्सचे 34 हजार 65, सायन्सचे 12 हजार 542 आणि एचसीव्हीसी शाखेचे 339 विद्यार्थी आहेत.  

तिसरी यादी नव्वदीपार

नामांकित कॉलेजचा शेवटच्या यादीचा कटऑफही नव्वदीपार होता. एच.आर कॉलेजची कॉमर्सची कटऑफ 91.40 टक्क्यांवर क्लोज झाली. तर रुईयाची आर्ट्सची कटऑफ 92 टक्के होती. एन.एम.कॉलेज कॉमर्स 90 टक्के, वझे-केळकर कॉमर्स 91.60 टक्के, फादर ऍग्नेल सायन्स 91.80 टक्के, सेंट झेवियर्स ऑर्ट्स 94 टक्के कटऑफ होता. 

आतापर्यंत 1 लाख 29 हजार प्रवेश

इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे आतापर्यंत एकूण 1 लाख 28 हजार 848 विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश निश्चित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशफेर्‍यांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. यातील 8 हजार 114 विद्यार्थ्यांना इनहाऊस कोटय़ातून, 23 हजार 892 विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक, 2 हजार 611 विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट तर 94 हजार 231 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश मिळाला आहे.

 विशेष फेरीसाठी 6, 7 ऑगस्टला पसंतीक्रम भरा

पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, अद्याप प्रवेश न मिळालेले तसेच नव्याने अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी विशेष गुणवत्ता फेरीत सहभागी होण्यासाठी 6 व 7 ऑगस्ट रोजी कॉलेज पसंतीक्रमात बदल करू शकतात. कॉलेज पसंतीक्रम भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्जाच्या भाग-2 ची प्रिंटआऊट काढून घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल.