
दहावीची परीक्षा झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेशाची लगबग सुरू केली आहे. अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 ते 14 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. तसेच 17 मेपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावीत महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. दरवर्षी दहावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव व्हावा, यासाठी प्रवेशाची वेबसाईट सुरू करण्यात येते. त्यानुसार 1 ते 14 मे या कालावधीत अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर 17 मेपासून दहावीचा ऑनलाइन निकाल लागेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्जाची पडताळणी विद्यार्थ्यांना करता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा भाग-2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येतील. सध्या शिक्षण उपसंचालक स्तरावर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अकरावी प्रवेशाची वेबसाइट 1 मेपासून कार्यान्वित केली जाईल, असेही पालकर यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेशाच्या तीन नियमित फेऱया, एक विशेष फेरी होणार आहे. ज्युनियर कॉलेजना नोंदणीसाठी 23 मेपासून संधी दिली जाणार असून प्रवेशासाठी https://11thadmission.org.in ही वेबसाईट देण्यात आली आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी तातडीने सुरू करावी. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावेत, अशा सूचनाही पालकर यांनी दिल्या आहेत.
























































