
माओवादी 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान विलय सप्ताह साजरा करतात. या काळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटकांचा वापर करतात. सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी माओवादी स्फोटके जंगल परिसरात जमिनीत पूरुन ठेवतात. अशा साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. आता विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे.
उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात शनिवारी पोस्टे पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवले आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे पुराडा पोलीस पथकासोबत असलेले डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असताना, संशयित जागा आढळल्याने त्याबाबतची माहिती अपर पोलीस अधिक्षक (अभियान) गडचिरोली यांना दिली.
वरिष्ठांच्या आदेशाने गडचिरोली येथुन बीडीडीएस पथक घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांचे सहाय्याने घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दीड ते दोन फूट खोल जमीनीमध्ये स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढऱ्या मळकट रंगाचे पाऊच 4 नग आढळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाली. घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमाल जप्त करून कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.


























































