
गडकोट ट्रेकर्स मुंबई यांच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी रायगड किल्ला अभ्यास ट्रेक आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ‘1 तारीख, 1 तास, 1 साथ’चा नारा देत रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
मोहिमेत ग्रुप लीडर पिराजी रेडेकर यांनी मावळय़ांच्या वेशभूषेत श्रमदान केले. केवळ ट्रेक करणे ही आपली जबाबदारी नसून देशाचे सुजाण नागरिक म्हणून गडावर ऐतिहासिक वास्तू आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची गडावर आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आला. रायगड किल्ला अभ्यास मोहिमेचे नियोजन अमोल आग्रे, किशोर पवार, पिराजी रेडेकर, सनी सुर्वे, साक्षी आंबेकर यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले यांच्यासह 23 जण या मोहिमेत भाग घेतला होता. सकाळी 6 वाजता गडाच्या चित्त दरवाजाने ट्रेकला सुरुवात झाली. गडकोट ट्रेकर्सने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देत शिवगर्जना दिली. संपूर्ण राजसदर आणि आजूबाजूचा परिसर, हिरकणी कडापासून ते श्री जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि शेवटी राजांच्या समाधी स्थळ येथे सगळे नतमस्तक झाले.




























































