‘गजा’ चक्रीवादळ तामीळनाडूमध्ये आज धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चेन्नई

‘गजा’ चक्रीवादळाचा तडाखा तामीळनाडूला शुक्रवारी सकाळी बसणार आहे असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी रात्री 8.30 वा. दिला. या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालेले असून सध्या ते दक्षिण-पूर्वच्या नागापट्टीणममध्ये सक्रिय असून वादळाची गती ताशी 90 कि.मी. ते 100 कि.मी. आहे. दरम्यान ‘गजा’ला तोंड देण्यासाठी एनडीआरएफसह इतर आपत्कालीन विभागाची पथके नागापट्टीणमसह तामीळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात तैनात केली आहेत.

या चक्रीवादळाचा तडाखा पुद्दुचेरीलाही बसणार असून या केंद्रशासित प्रदेशातही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईतील अण्णा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. या परीक्षा 13 डिसेंबर रोजी होतील असे स्पष्ट केले आहे. या चक्रीवादळाचा तडाखा आज मध्यरात्रीही बसू शकतो.