श्रींची पालखी शेगावात दाखल; खामगाव ते शेगाव रस्ता भक्तांच्या गर्दीने फुलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शेगाव

आषाढी वारीकरीता पंढरपुरला गेलेल्या श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे आज संत नगरीत आगमन झाले असता पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. श्रींच्या पालखीचा ५ ऑगस्ट रोजीचा खामगाव मुक्काम आटोपून पालखी सकाळी ६ वाजता शेगावकडे निघाली. यावेळी खामगाव ते शेगाव या मार्गात पालखीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी समवेत पायदळ लाखो भाविक सहभागी झाले होते.

श्रींच्या पालखीचे सकाळी ११ वाजता श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेशद्वारावर आगमन झाले असता महाविद्यालयाचे संचालक शरद शिंदे, हरिहर निळकंठ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमाणी, श्री ग.म. इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता पाटील यांचेहस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करण्यात आले. पालखीचे यंदाचे ५२ वे वर्ष होते. एकूण १३०० कि.मी.चा प्रवास करुन परतलेल्या पालखी सोबत खामगाव येथून हजारो भाविक भक्त पायी वारी करत शेगावला आले. त्यामुळे या रस्त्याला यात्रेचे स्वरुप आले होते. जय गजानन श्री गजाननाच्या नामघोषाने हा मार्ग भक्तीचा महामार्ग झाला होता. यानंतर दुपारी १२ वाजता श्रींच्या पालखीचे श्री गजानन वाटीका येथे आगमन झाले असता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन केले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नारायण पाटील, कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील व इतर विश्वस्तांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी श्रींची आरती होवून पालखीतील सहभागी शेकडो वारकरी व हजारो भाविकभक्तांना संस्थानतर्पेâ महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी २ वाजता पालखी सोहळा मंदिराकडे निघाला. या मार्गात ठिकठिकाणी शहरातील स्वयंसेवी संस्था व मंडळातर्पेâ चहा, नास्ता व फराळाचे वितरण करण्यता आले. पालखी सोहळा रेल्वे स्टेशन, अग्रसेन चौक, शिवाजी चौक, बाजारपेठ, गांधी चौक, गाडगेबाबा चौक या मार्गाने जाऊन पालखी संध्याकाळी ६ वाजता मंदिरात पोहचली. तेथ नयनरम्य असा वारकर्‍यांचा रिंगण सोहळा व महाआरती होऊन या पालखी सोहळ्याची सांगता झाली. पालखी सोहळ्यानिमित्त शहरात भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता.