पूरग्रस्तांसाठी गणेशोत्सव मंडळे सरसावली, जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची केली मदत

राज्यात कोकण, सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. मुंबईकरांच्या या मदतीत आता मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील पुढाकार घेतला असून कोकण, कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लालबाग येथील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व गणेशगल्ली मंडळाने पूरग्रस्तांसाठी एकूण 2 लाखांच्या किमतीची मदत देऊ केली आहे, तर इतर  काही मंडळांनी पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरे भरवण्याची तयारी सुरू केली आहे.

Photo –  पूरग्रस्तांसाठी गणेशोत्सव मंडळे सरसावली

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली आणि कोल्हापूर येथे पूर आला. त्यामुळे अनेक गावांना फटका बसला असून तेथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातून अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटना आणि इतर दानशूर पुढे आले आहेत. या मदतीच्या महायज्ञात आता मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मोलाची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या वतीने तब्बल 2 लाखांहून अधिक किमतीच्या गृहोपयोगी वस्तूंची मदत चिपळूण शहर आणि महाड येथील कोथवाडी आणि काजळपुरा या गावांत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी दिली, तर चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेदेखील मदतीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी अनेक हात पुढे येत असले तरी कोकणातील अनेक आदिवासी पाडय़ांत मदत पोहोचलेली नाही. या आदिवासी पाडय़ांना मदत करण्याचा निर्णय चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाने घेतला असून त्यासाठी पुढील आठवडय़ात मदत रवाना होणार आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत, पण तेथील नागरिकांची खरी गरज काय आहे, याचा आढावा घेण्याचा निर्णय काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. यासाठी मंडळाचे एक पथक लवकरच कोकणात दाखल होऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर उत्सव कालावधीत मदत केली जाईल अशी माहिती काळाचौकी महागणपतीचे प्रमुख कार्यवाह अमन दळवी यांनी दिली. 

आपली प्रतिक्रिया द्या