
बाप्पाच्या आगमनाला जेमतेम तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या पूजेसह डेकोरेशनसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. शनिवारी क्रॉफर्ड मार्पेट, काळबादेवी, दादर, लालबाग, बोरिवली, घाटकोपर अशा बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची तुफान गर्दी झाली. सर्वच वस्तूंना महागाईची झळ बसली तरी ‘बाप्पासाठी कायपण…’ असे म्हणत प्रत्येकजण सढळ हस्ते खर्च करत होता.
बाप्पाच्या स्वागतासाठी गेल्या महिनाभरापासून बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा पूजा साहित्याच्या रेडिमेड किटला भक्तांची पसंती आहे. पर्यावरणपूरक मखर अगदी दोन हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. काहींनी घरच्या घरी डेकोरेशन करण्यासाठी प्लॅस्टिकची आकर्षक फुले, पडदे, झालर खरेदी केले. आकर्षक लायटिंग, झुंबर खरेदीसाठी लोहार चाळीत गर्दी झाली.
झेंडूने शंभरी गाठली
आठवडाभरापूर्वी 40 रुपये किलो दराने मिळणाऱ्या झेंडूसाठी आता शंभर रुपये मोजावे लागतायत. शेवंती आणि गुलाबदेखील 300 रुपये किलो आहे. पावसामुळे मालाची नासाडी झाल्याने मार्पेटमध्ये कमी झालेली आवक आणि त्यातुलनेत मागणीत झालेली वाढ यामुळे फुलांच्या किमती वाढल्याचे दादरमधील फूल विक्रेते सुमित गायकवाड यांनी सांगितले.