मंडपांसाठी 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार, लोकप्रतिनिधी-समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच गणेशोत्सवाच्या संदर्भात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शिफारस करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या आयोजनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व समन्वय समितीची ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मंडपांच्या परवानगीचे अर्ज सादर करण्याची मुदत 2 सप्टेंबरवरून 5 सप्टेंबर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री व उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार आशीष शेलार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र दहीबावकर, सुरेश सरनोबत, किरण खानोलकर, गिरीश वालावलकर, सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर आदी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली. गणेशोत्सव मंडळांना सध्या सहा वेगवेगळय़ा परवानग्या घ्याव्या लागतात, पण त्या एकाच अर्जात मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गणेशोत्सव साजरा करण्याच्या मुद्दय़ावरून दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत स्थापन केलेल्या उपसमितीकडे हे गुन्हे मागे घेण्याबाबत शिफारस. अग्निशमन दल व वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र विनाविलंब द्यावे. ज्या मंडळाचे अर्ज या वर्षी रद्द झाले आहेत त्या मंडळांशी चर्चा करून त्यांना कायदेशीर मार्गाने परवानगी कशी देण्याबाबत चर्चा करून मार्ग काढणार. या वर्षी ऑनलाइन अर्ज करताना सादर केलेल्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वेळेस अर्ज करताना गणेशोत्सव मंडळांना कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जनाच्या मार्गावरच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी डेडलाइन. माऊंट मेरी जत्रा व मोहरमही याच काळात असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन व स्वयंसेवक व गार्डची नियुक्ती.

पाच दिवसांपर्यंत मर्यादा वाढवा
गणेशोत्सवाच्या काळात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवण्यासाठी चार दिवस परवानगी आहे. पण ही परवानगी पाच दिवसांसाठी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांनी यावेळी केली.