
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.
राज्यपालांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ राहिलेले शेकापचे सदस्य गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
“राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या श्री देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – अजित पवार
गणपतराव आबांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं.महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला.
राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले – फडणवीस
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
































































