कचरा निर्मुलनाचे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या सनियंत्रण समितीकडून शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. कचरा निर्मुलनासाठी आलेले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाकडून शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला. तसेच कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन घोसाळकर यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

महानगरपालिकेत महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, पाच महिन्यापासून शहरात कचरा कोंडी होत आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून फार मोठया प्रमाणात कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. या कचरा प्रश्नावर शिवसेनेची भूमिका मांडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी संवेदनशील आहेत. पक्षप्रमुखांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी  महापौरांना आदेश दिले आहेत. जेव्हा पासून कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा पासून कचऱ्यावर वेगवेगळया माध्यमातून चर्चा झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यानी मदतीसाठी सकारात्मक हात दिला. उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न गेल्यामुळे त्यातच बराच वेळ गेला. सर्वोच्च न्यायालयाने सनियंत्रण समिती गठीत करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती गठीत केली. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांचा समावेश करण्यात आला. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या. परंतु या जागांवर कचरा टाकण्यास विरोध झाला असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

सनियंत्रण समितीने चार ठिकाणची जागा उपलब्ध करून दिल्यानंतर कचरा निर्मुलनाकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. या संबंधी कधीही मनपा पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या नाही. परस्पर निर्णय घेण्यात आले. सनियंत्रण समितीकडून कचरा प्रश्न सोडविला जात नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने आंदोलन केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा थयथयाट झाला. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान, पर्यावरणाचा ऱ्हास यासारखे खोटे गुन्हे दाखल केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला देशभक्ती शिकवली आहे. शिवसैनिक हा देशभक्त असून त्याच्या हातून कदापिही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही. शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेंतली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी कचरा निर्मुलनातील आपले अपयश झाकण्यासाठी त्यांच्याकडूनच शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना आवर घालावा. मुख्यमंत्र्यांच्या भावनांची दखल घेतली नाही, त्यांना समज देण्यात यावी. असेही घोसाळकर म्हणाले. शिवसेनेला आंदोलन नवीन नाही, परंतु जिल्हाधिकांऱ्याकडून शिवसेनेच्या आंदोलनास अतिरेक्यांसारखे वळण देण्याचे काम केले जात आहे. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. पावसाळयात कचऱ्याची कोंडी कोणी करू नये, सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन घोसाळकर यांनी केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन आदींची उपस्थिती होती.