
सामना प्रतिनिधी । गारगोटी
गारगोटी हे भुदरगड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून गारगोटी शहरामध्ये सुमारे ४० वर्षापुर्वी नवीन बसस्थानक बांधण्यात आले होते. बस स्थानक झाल्यानंतर शहराची व तालुक्याची झपाट्याने वाढ झालेली आहे. तसेच प्रवाशी व गाड्यांची संख्या वाढूनही बसस्थानकामध्ये सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची व कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे गारगोटी बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
बसस्थानकामध्ये आणखी नवीन २ बस थांबे वाढविण्याबरोबरच नवीन स्वच्छता गृह व इतर सर्व सोयी-सुविधांयुक्त नवीन बसस्थानक होण्याची मागणी वारंवार होत होती. त्यासअनुसरून आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रत्यक्ष बसस्थानकास भेट देवून अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांशी चर्चा केली. यावेळी चालक व वाहकांच्या भोजनासाठी बैठक व्यवस्था, संपूर्ण परीसर खडीकरण-डांबरीकरण, गारगोटी बसस्थानकामध्ये स्वच्छता गृहांची स्वतंत्री उभारणी तसेच नुतनीकरण करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यासाठी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयास पाठविण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. हा आराखडा मुंबई येथे गेल्यानंतर याला तात्काळ प्रशासकीय मान्यता देवून टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
पुढील ४० वर्षांच्या दृष्टीने बसस्थानक अद्यावत होण्यासाठी आमदार आबिटकर वारंवार पाठपुरावा करत आहेत. यावेळी सरपंच धनाजी खोत, एसटी महामंडळाचे डिव्हीजनल इंजिनिअर उत्तम जावडेकर, आर्कीटेक्चर नागेश देशपांडे, बसस्थानक मॅनेजर बुवा यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.































































