
गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार घरे जळून खाक झाल्याची घटना सांगलीतील पंचशीलनगर झोपडपट्टीत शुक्रवारी घडली आहे. कामानिमित्त या घरातील कुटुंबे बाहेर गेली असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दलातील अधिकारी विजय पवार यांच्यासह चौघे जखमी झाले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
शांतिनिकेतन कॉलेजच्या शेजारी मेंडगुळे वस्ती आहे. या ठिकाणी असणाऱया रेल्वे रूळ शेजारीच झोपडपट्टी असून, पत्र्यांची अनेक छोटी घरे आहेत. शुक्रवारी या वस्तीतील नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅसगळती झाली. त्यामुळे भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांनी धावाधाव सुरू केली. घटनेची माहिती मिळताच, मनपा अग्निशमन दलाचे चार बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली. त्याठिकाणची गर्दी बाजूला करून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न अग्निशमनच्या जवानांनी सुरू केले. या चार घरांमध्ये एकूण आठ सिलिंडर होते. त्यातील सात सिलिंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.
नंदकुमार जावीर यांच्या घराला कुलूप असल्याने तो सिलिंडर बाहेर काढण्यास अडथळा आला. त्याचवेळी या गॅसचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता घराचा पत्रा छेदून सिलिंडर बाहेर फेकला गेला. याचवेळी या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार, फायरमन रामचंद्र चव्हाण, सुनील माळी हे गंभीर जखमी झाले. या स्फोटात परिसरातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. परिसरातील संग्राम जावीर, नंदकुमार जावीर, दगडू चवरे आणि विजय पडळकर यांची घरे जळून खाक झाली आहेत. गॅसचा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील काही घरे हादरून गेली होती. दरम्यान, स्फोटाचे कारण समजू शकले नाही.




























































