
बहुचर्चित काळाघोडा फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱयांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून ‘एक्सेसेबल इंडिया’चा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारली आहे. सुमितचे हे शंभरावे आर्ट इन्स्टॉलेशन आहे.
अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तीन टक्के व्यक्ती दिव्यांग आहेत. शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असणारे लोक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला, ऍसिडपीडित तसेच तृतीयपंथीयांना वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास खऱया अर्थाने देश सुगम्य आणि सुसज्ज होईल, हाच संदेश या प्रतिकृतीच्या माध्यमातून दिला आहे.
– सुलभ व सहज प्रवास व संपर्क ही केवळ दिव्यांगांचीच नव्हे तर सर्वांची गरज आहे. शाळा, हॉटेल्स, सिनेमागृह, सार्वजनिक उद्याने, वैद्यकीय उपचार केंद्र, मेडिकल मॉल्स अशा सर्वच ठिकाणी दिव्यांगांसह सर्व व्यक्तींना सुलभ भाणि सुगम्य वातावरण निर्मिती हे प्रगतशील देशाची नांदी ठरेल, अशी प्रतिक्रिया सुमित पाटील याने दिली.