तौकतेचे आफ्टर शॉक्स; गेट वे ऑफ इंडिया परिसराचे प्रचंड नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळाचा फटका मुंबईची ओळख असलेली गेट वे ऑफ इंडिया ही पुरातन वास्तू असलेली दगडी कमान आणि परिसराला बसला असून वास्तूला लागून असलेल्या जेट्टीची भिंत तुटली तर पेव्हर ब्लॉक निखळून बाहेर आले. लोखंडी बॅरिकेड्सचेही मोठे नुकसान झाले. परिसरात समुद्रातील कचरा, गाळ आणि रेती सर्वत्र पसरली. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी तत्काळ परिसराला भेट देत पाहणी केली आणि वास्तू परिसराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई पोर्ट ट्रस्टला दिले आहेत.

‘तौकते’ चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्री गुजरातच्या दिशेने सरकले असले तरी या वादळाने सोमवारी मुंबईची दाणादाण उडवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले कठोर निर्बंध आणि वादळाची पूर्वसूचना यामुळे मुंबईकर घराबाहेर पडले नाहीत. मात्र मुंबईतील कोरोना सेंटर्स, लसीकरण केंद्रांसह शेकडो झाडे, पक्ष्यांना याचा फटका बसलाच, पण मुंबईची शान असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसराला बसला. गेट वे ऑफ इंडियाजवळच्या जेट्टीच्या भिंतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. भिंतीचे प्रचंड वजनाचे दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले. परिसरातील पेव्हर ब्लॉक उखडून बाहेर पडले. वादळामुळे मोठय़ा प्रमाणात कचरा, गाळ व रेती वाहून बाहेर आल्यामुळे शेकडो पर्यटकांनी गजबजणारा हा परिसर बकाल झाला. दरम्यान, जेट्टीच्या भिंतीचे झालेल्या नुकसानीबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने ऑडिट करून दुरुस्ती करावी, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. यावेळी ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, पालिका पुरातन वास्तू जतन समितीचे संजय सावंत उपस्थित होते. दरम्यान, महापौरांनी वांद्रे-कुर्ला संकुलामधील जम्बो कोरोना केंद्राचीही पाहणी केली. केंद्राला कोणतेही नुकसान झाले नसल्याचे महापौरांनी सांगितले.